– नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापौर, आयुक्तांचे आवाहन
नागपूर :- ‘जनकल्याणासाठी जनगणना’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या देशातील १६ व्या राष्ट्रीय जनगणनेतील घरगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला शनिवार (ता. 16) शहरात सुरुवात होणार आहे. या टप्प्यात शहरातील प्रगणक प्रत्येक घरांना भेटी देणार असून, यात घरांची नोंदणी तसेच कुटुंब प्रमुखांकडून कुटुंबाबद्दलची माहितीची नोंदणी करून जनगणनेचा दुसरा टप्पा पूर्ण केला जाणार आहे.
संपूर्णपणे डीजीटल पद्धतीने यावर्षी जनगणना प्रक्रिया राबविण्यात येत आहे. देशाच्या व शहराच्या विकासासाठी जनगणना अत्यावश्यक व महत्त्वाची बाब असल्याने पहिल्या टप्प्यात नागपूरकरांनी दिलेल्या प्रतिसादानंतर घरी येणार्या प्रगणकांना सहकार्य करून जनगणनेचा हा टप्पा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर निता ठाकरे व आयुक्त डॉ. विपीन यांनी केले आहे.![]()
जनगणनेचा पहिला स्व-गणनेचा टप्पा 1 मे ते 15 मे या काळात पूर्ण झाला आहे. आता दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी शहरात 3992 हाऊस लिस्टिंग ब्लॉक तयार केले आहेत. यात 16 मे पासून घरांची नोंदणी करण्याची प्रक्रिया प्रगणकांकडून केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शहरात एकूण 4500 प्रगणक व 700 पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. हे प्रगणक 16 मे ते 14 जून या काळात प्रत्येक घरी जाऊन नोंदणी करतील. प्रगणक मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरगणना प्रक्रिया पूर्ण करतील. प्रगणक आपआपल्या क्षेत्राचा लेआऊट नकाशा तयार करणार आहेत. यानंतर ते घरांना क्रमांक दिल्यानंतर ते कुटुंब प्रमुखांकडून कुटुंबाबद्दलची माहितीची नोंद घेतील.
एसई आयडी क्रमांक
ज्या नागरिकांनी 1 मे ते 15 मे या काळात डीजीटल पद्धतीने स्वगणना केलेली आहे. त्या नागरिकांनी 11 अंकी एसई आयडी क्रमांक प्रगणकांना द्यावयाचा आहे. प्रत्येक प्रगणकावर साधारणतः ८०० नागरिक व कुटुबाची माहिती संकलित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १६ मे ते १४ जून या काळात हे प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन ‘HLO App’ (House Listing Operation Application) च्या मदतीने माहितीची नोंदणी करतील. कुटुंबाच्या संबंधित प्र्श्नांची उत्तरे देऊन नागरिकांनी प्रगणकांना सहकार्य करावे व हे राष्ट्रीय कार्य पार पडण्यासाठी मदत करावी, असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी केले आहे.
धरमपेठ झोनमध्ये बैठक
धरमपेठ झोनमधील पर्यवेक्षकांची बैठक वाल्मिकी उच्च प्राथमिक शाळेत पार पडली. यात प्रभाग 12, 13, 14 व 15 च्या मध्ये प्रगणकांसोबत येणार्या संभाव्य अडचणींवर चर्चा करण्यात आली. यात या झोनमधील जनगणनेच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रभारी अधिकारी व संबंधित अभियंत्यांच्या बैठकीत सहाय्यक आयुक्तांनी मार्गदर्शन केले व पर्यवेक्षकांच्या शंकाचे समाधान केले.