नागपूर :- नागपूरचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेश मंदिर टेकडी येथे भक्तांच्या सहकार्याने आणि मंदिर कार्यकारिणीच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या चांदीच्या सिंहासनाचे लोकार्पण बुधवारी, दि.३ जून २०२६ रोजी संकष्टी चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर करण्यात येणार आहे. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भाविकांच्या उदंड प्रतिसादातून तयार करण्यात आलेले हे भव्य चांदीचे सिंहासन श्री गणरायाला अर्पण करण्यात येणार असून, यानंतर श्री गणेश भगवान रिद्धी-सिद्धीसह या सिंहासनावर विराजमान होणार आहेत. या धार्मिक आणि ऐतिहासिक सोहळ्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. भक्तांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पूर्णत्वास आल्याबद्दल मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व दाते व भाविकांचे आभार व्यक्त केले आहेत. या सोहळ्यामुळे श्री गणेश मंदिर टेकडीच्या धार्मिक वैभवात आणखी भर पडणार असून, नागपूरकरांसाठी हा एक विशेष आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.








