श्रीहरीनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे चार दिवसीय दर्शनीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. दि. 30 मे, शनिवारी सर्वप्रथम नागपूरहून अमरकंटक साठी प्रस्थान केले. रात्री भोजन घेऊन दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी रामघाट येथे प्रात: स्नान करून माॅ. नर्मदा नदीच्या उगम स्थानाचे दर्शन, शक्तिपीठाचे व अमरेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांनी नाश्ता करून मैहर साठी प्रस्थान केले. दुपारी सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेऊन बस मैहरगडच्या प्रवासासाठी निघाली. मैहरगडला पोहचल्यावर भक्त मंडळींनी माॅ. शारदा मातेचे दर्शन घेऊन प्रसादालयात भोजनाचा आनंद घेतला.
मैहरगडावरुन – मैहरवस्तीकडे एयर बसद्वारे परतीचा प्रवास करतांना डोंगरदऱ्यातील डूलणारी झाडे, निसर्गरम्य परिसर व रात्रीला गावातील दिव्यांचे लखलखणाऱ्या प्रकाशाचे विलोभनीय दृश्य पाहून सर्व भक्तमंडळीचे मन आनंदाने भरून आले. तिसऱ्या दिवशी सोमवारला सकाळी भक्तमंडळींनी नाश्ता करून बसचे चित्रकूटसाठी प्रस्थान झाले. चित्रकूट येथे सर्वप्रथम गुप्त गोदावरी नदीचे दर्शन घेतल्यानंतर रामघाट येथील मंदाकिनी नदी, हनुमानधारा, सितारसोई, जानकी कुंडाचे दर्शन घेऊन मंदाकिनी नदीवरील सायंकाळच्या आरतीचा नौकाविहार करून स्वयंस्फूर्तीने पूजा- आरतीचा आनंद घेतला. सर्वच भक्तमंडळीचे मन दिव्यांचा झगमगाट व प्रसन्न वातावरणाने आनंदाने भरून आले. रात्रीचे भोजन करून चौथ्या दिवशी मंगळवारला बस बेळघाटच्या प्रवासासाठी निघाली.
बेळघाट येथील धुवांधार जलप्रपात (Waterfall), नर्मदा नदीमध्ये बोटिंगद्वारे मार्बल रॉक, भुलभुलैया यांचे निरीक्षण केले. नर्मदा नदीमधील मनमोहक, आल्हाददायक वातावरणाचा आनंद सर्व भक्तमंडळींनी घेतला. नावाड्याने निसर्गाचे महत्त्व पटवून दिले. आपल्याला निसर्गाने भरभरून दिले, आपणही निसर्गाचे संवर्धन करूया. ही आकांक्षा मनी बाळगून भक्तमंडळींनी रुचकर, स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेऊन बस नागपूरच्या प्रवासासाठी निघाली. ही सहल यशस्वीकरण्यासाठी श्रीहरी नगर ज्येष्ठ नागरिक मंडळातील पदाधिकारी सुरेशराव उरकुडे, केशवराव बोपुलकर, प्रवीणजी सुरकर, घनश्याम ढोले, कुंभारे, सोनवणे, पौनीकर, मंगला ऊरकूडे लता ढोले, पुष्पा सुरकर, उरकुडे, तनुजा टेंभेकर (फोटोग्राफर) व सर्व भक्तमंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले.








