नागपूर :- दि महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्युनिअर ब्युटी प्रॅक्टिशनर’ (बॅच क्र. 456) या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना यावेळी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या प्रधान महालेखापाल सुहासिनी गोतमारे (I.A.& A.S.) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी बँक ऑफ महाराष्ट्र, नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक व विभागीय व्यवस्थापक जी. अनंतकुमार होते. तर प्रसिद्ध सनदी लेखापाल (सीए) सुप्रिया देशपांडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्या सुहासिनी गोतमारे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांनी कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर बनावे असे आवाहन केले. प्रशिक्षणातून प्राप्त झालेल्या तांत्रिक व व्यावहारिक ज्ञानाचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारल्यास समाजात आदर्श निर्माण करता येईल असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात जी. अनंतकुमार यांनी प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करताना बँक ऑफ महाराष्ट्रमार्फत उपलब्ध विविध कर्ज योजना, आर्थिक सहाय्य व उद्योजकतेला चालना देणाऱ्या सुविधा यांची माहिती दिली.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा, असे आवाहन त्यांनी केले.विशेष अतिथी सीए सुप्रिया देशपांडे यांनी महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन व्यवसाय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करावी, असे सांगितले. व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पहिलं पाऊल उचलणं महत्त्वाचं असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाबँक RSETI नागपूरचे संचालक व्ही.बी. दहीकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. ग्रामीण व शहरी भागातील युवक- युवती आणि महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. संस्थेच्या माध्यमातून अनेक लाभार्थींनी स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारून आर्थिक प्रगती साधल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमा दरम्यान प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणातून मिळालेल्या अनुभवांविषयी मनोगते व्यक्त करत संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपस्थित पाहुण्यांचा परिचय विकास रानडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन चंदू नागपुरे यांनी केले, तर तीनोपल गेडाम यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाबँक RSETI चे कर्मचारी क्रुणाल धोने व मंगेश वरपल्लीवार यांनी विशेष परिश्रम घेतले. या समारोप सोहळ्यामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये नव्या उमेद, आत्मविश्वास आणि उद्योजकतेची प्रेरणा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने सक्षम करण्यासाठी महाबँक RSETI नागपूरची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे उपस्थितांनी यावेळी नमूद केले.








