– गुमथळा येथील नाला खोलीकरण कामाची केली पाहणी
कामठी :- राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील गुमथळा येथे महसुली नाल्याच्या खोलीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळ्यात नाल्यातील पाणी शेजारील शेतजमिनीत शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची समस्या स्थानिक शेतकऱ्यांनी मांडली होती. या समस्येची गांभीर्याने दखल घेत नाल्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. या कामामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक प्रभावीपणे होणार असून शेतजमिनींचे नुकसान टळण्यास मदत होणार आहे. तसेच परिसरातील जलव्यवस्थापन सुधारून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नाल्याच्या खोलीकरणामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
पाहणी दरम्यान त्यांनी नाल्याच्या बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारून त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बावनकुळे यांनी कामाची गुणवत्ता आणि वेळेत काम पूर्ण करण्याच्या सुचनाही केल्या.
त्यांच्यासोबत यावेळी भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान, भवरी ग्रामपंचायत चे सरपंच ऋषी भेंडे, योगेश डाफ, चंद्रशेखर डाफ, महेश काकडे, पंकज राऊत , खुशाल डाफ, सुरेश रामटेके, सुनील डाफ यांच्यासह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.







