– शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे यांच्या पाठोपाठ युवा शहराध्यक्ष शुभम मोरे यांचाही आम आदमी पार्टीला रामराम
नागपूर :- आम आदमी पार्टीच्या नागपूर संघटनेला आणखी एक मोठा धक्का बसला असून युवा नागपूर शहराध्यक्ष शुभम संजय मोरे यांनी ८ जून रोजी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी नागपूर शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे यांनीही पक्षाला रामराम ठोकला होता. त्यांच्या पाठोपाठ आता युवा शहराध्यक्षांनीही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने नागपूरमधील पक्ष संघटनेत खळबळ उडाली आहे. शुभम मोरे यांनी महाराष्ट्र आम आदमी पार्टीचे संघटन सचिव भूषण ढाकुलकर यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक कारणांमुळे आणि भविष्यातील वैयक्तिक नियोजन लक्षात घेऊन घेतल्याचे नमूद केले आहे. तसेच पक्षाने दिलेल्या संधीबद्दल आणि पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मात्र, प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शुभम मोरे यांनी पक्षातील संघटनात्मक कामकाजाबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून पक्षासाठी ९,६०० हून अधिक मते मिळवून देण्यात यश आले, तरी स्थानिक कार्यकर्ते आणि नेतृत्वाला अपेक्षित सन्मान, संधी आणि पाठबळ मिळाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मते, नागपूरमध्ये पक्षाची पाळेमुळे मजबूत करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. जनसंपर्क, संघटन विस्तार आणि विविध स्थानिक प्रश्नांवर आंदोलने करून पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या योगदानाची योग्य दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
शुभम मोरे यांनी असेही म्हटले आहे की, नागपूर शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे यांना संघटन वाढीसाठी आवश्यक स्वातंत्र्य आणि वरिष्ठ पातळीवरील सहकार्य मिळाले नाही. महाराष्ट्रातील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि स्थानिक संघटनेकडे झालेल्या दुर्लक्षामुळे अनेक कार्यकर्त्यांचा पक्षावरील विश्वास कमी होत गेला.
“नागपूरमध्ये आम आदमी पार्टी उभी करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेतली. मात्र त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेतली गेली नाही. त्यामुळे हा निर्णय घेणे भाग पडले,” असे शुभम मोरे यांनी स्पष्ट केले. राजीनाम्यानंतरही सामाजिक आणि जनहिताच्या प्रश्नांवर सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी सर्व सहकारी कार्यकर्ते, समर्थक आणि नागपूरकर नागरिकांचे आभार मानले आहेत. नागपूर शहराध्यक्ष आणि युवा शहराध्यक्ष या दोन्ही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या सलग राजीनाम्यांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील आम आदमी पार्टीच्या संघटनात्मक स्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्ष नेतृत्व यावर काय भूमिका घेते आणि संघटना पुन्हा उभी करण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








