spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गर्भलिंग निदान रॅकेटचा विस्तार उघड; पुण्यातून सहावे सोनोग्राफी मशीन जप्त

श्रीरामपूर :- पिंपरी निर्मळ येथे उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या आंतरजिल्हा रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होत असून, पोलिसांनी पुण्यातून आणखी एक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन जप्त केले आहे. यामुळे आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या मशीनची संख्या सहावर पोहोचली आहे.

या प्रकरणात वाघोली (पुणे) येथील डॉ. अतुल जाधव याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे झाले. तपासादरम्यान डॉ. जाधव हा बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी विनानोंदणीकृत सोनोग्राफी मशीनचा वापर करत असल्याचे निष्पन्न झाले.

चौकशीत त्याने हे मशीन यापूर्वी अटक करण्यात आलेल्या मेडिकल साहित्य पुरवठादार नरेंद्र ठाकरे याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानंतर लोणी पोलिस आणि अपर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने डॉ. जाधवला सोबत घेऊन वाघोली येथील त्याच्या केंद्रावर छापा टाकला. या कारवाईत बेकायदेशीर गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले.

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, या मशीनच्या मदतीने पुणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्भलिंग निदान चाचण्या केल्या जात होत्या. पोलिसांच्या तांत्रिक आणि सखोल तपासातून विविध तालुके आणि जिल्ह्यांमध्ये एजंटांचे विस्तृत जाळे कार्यरत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत सहा सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आल्याने या बेकायदेशीर साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्यांवर तपासाचा फोकस

डॉक्टर, मेडिकलचालक आणि एजंटांच्या अटकेनंतर आता तपासाचा रोख बेकायदेशीर गर्भपात करणारे डॉक्टर, दवाखाने आणि त्यांना गर्भवती महिला पुरवणाऱ्या एजंटांकडे वळविण्यात आला आहे. कर्जत येथून अटक करण्यात आलेला एजंट राम पवार याच्याकडून मोठ्या प्रमाणात गर्भपाताच्या गोळ्या जप्त करण्यात आल्याने या प्रकरणातील धागेदोरे आणखी मजबूत झाले आहेत.

या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्व घटकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली असून, आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्येविरोधातील ही कारवाई राज्यातील अशा रॅकेटविरोधातील सर्वात मोठ्या मोहिमांपैकी एक मानली जात आहे.

Popular Articles