नागपूर :- भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) कर्मचाऱ्यांची देशातील प्रमुख संघटना असलेल्या अखिल भारतीय विमा कर्मचारी संघटनेने (एआयआयईए) स्थापनेची गौरवशाली ७५ वर्षे पूर्ण केली असून यंदाचे वर्ष प्लॅटिनम ज्युबिली वर्ष म्हणून देशभर उत्साहात साजरे करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचे हक्क, सामाजिक सुरक्षा, सार्वजनिक क्षेत्राचे संरक्षण तसेच विमाधारकांच्या हितासाठी सातत्याने लढा देणाऱ्या या संघटनेने आपल्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत. १ जुलै १९५१ रोजी स्थापन झालेल्या एआयआयईएने भारतीय जीवन विमा महामंडळाच्या राष्ट्रीयीकरणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय सर्वसाधारण विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण, वेतन करार, पेन्शन सुधारणा, खासगीकरणा विरोधातील आंदोलने तसेच विमा प्रीमियमवरील जीएसटी विरोधातील देशव्यापी जनआंदोलन यांसारख्या विविध लढ्यांमध्ये संघटनेने अग्रणी भूमिका निभावली आहे. प्लॅटिनम ज्युबिली वर्षानिमित्त नागपूरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत २६ जून रोजी सकाळी १० वाजता. मोहन नगर येथील सहकार जीवन सभागृहात विमा कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार समारंभ व मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच, १ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता एलआयसी मुख्यालया पासून ओरिएंटल बिल्डिंगपर्यंत विश्वशांती, सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश देणारी भव्य मानवी साखळी उभारण्यात येणार आहे. या उपक्रमातून समाजात शांतता, सौहार्द आणि एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने विमा कर्मचारी सहभागी होणार असून नागपूरमधील मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी या ऐतिहासिक उपक्रमांना प्रसिद्धी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन संघटने च्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.
अखिल भारतीय विमा कर्मचारी संघटनेच्या प्लॅटिनम ज्युबिली वर्षानिमित्त विश्वशांतीसाठी मानवी साखळीचे आयोजन









