spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडाऱ्यातील ट्युशन क्लासेस आणि व्यावसायिक इमारतींची मुख्याधिकाऱ्यांकडून ‘औचक पाहणी’; अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्याचे आदेश

हंसराज,भंडारा :- शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि अनधिकृत बांधकामांच्या विरोधात भंडारा नगर परिषदेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी शहरातील विविध व्यावसायिक इमारती आणि ट्युशन क्लासेसना अचानक भेटी देऊन त्यांच्याकडे असलेल्या परवान्यांची आणि अग्निशमन यंत्रणेची कसून चौकशी केली. या मोहिमेमुळे शहरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

भंडारा शहरातील ज्या भागात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते, अशा ‘ट्युशन गल्ली’मध्ये मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः उतरून पाहणी केली. यामध्ये मलन टॉवर, स्पार्क क्लासेस, गिर्हेपुंजे इंग्लिश क्लासेस, महालकार फिजिक्स क्लासेस, आयडियल अकेडमी, CATALIZER क्लासेस आणि शिक्षा क्लासेस या संस्थांचा समावेश होता. या क्लासेसमध्ये अग्निशमन यंत्रणा (Fire Safety) कार्यान्वित आहे का? इमारतीचे बांधकाम अधिकृत आहे का? आणि आवश्यक सर्व परवाने घेतले आहेत का? याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. ज्या इमारतींकडे अधिकृत परवाने नाहीत, त्यांना तात्काळ नोटिसा बजावण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहेत.

शहरात अनेक ठिकाणी उच्च-दाब विद्युत वाहिनीच्या (High-Tension Wire) खाली जीवघेणी अनधिकृत बांधकामे सुरू असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. या तक्रारींची दखल घेत मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, नगर रचनाकार पवन कनोजे आणि अग्निशमन अधिकारी समीर गणवीर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. विद्युत वाहिनीखालील हे बांधकाम अत्यंत धोकादायक असून, संबंधित मालमत्ता धारकांना नोटीस देऊन कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना दिले.

“विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या कोणत्याही अनधिकृत गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. ट्युशन क्लासेस आणि व्यावसायिक इमारतींनी अग्निशमन आणि बांधकाम विभागाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे,” असे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी स्पष्ट केले आहे.

या मोहिमेत नगर परिषदेचे नगर रचनाकार, अग्निशमन अधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते. आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.