spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

७ दिवसांत त्रुटी सुधारा, अन्यथा ‘कॅटलायझर क्लासेस’ होणार सील; भंडारा मुख्याधिकाऱ्यांचा कडक इशारा

हंसराज,भंडारा :- शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर भंडारा नगर परिषद आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे. कॅनल रोडवरील प्रसिद्ध ‘कॅटलायझर क्लासेस’ (CATALIZER Classes) येथे आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने, मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी या संस्थेला कडक नोटीस बजावली आहे. येत्या ७ दिवसांत त्रुटींचे अनुपालन न केल्यास क्लासेसचा वीज व पाणीपुरवठा खंडित करून इमारत सीलबंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६, (२००७ चा महा. ३)कलम ५ अंतर्गत २४ जून २०२६ रोजी नगर परिषदेच्या पथकाने या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या तपासणी दरम्यान, इमारतीची उंची आणि तेथील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, आग प्रतिबंधक यंत्रणा आणि जीवसंरक्षक उपाययोजना अपुऱ्या असल्याचे तसेच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

७ दिवसांचा ‘अल्टिमेटम’ नगर परिषद प्रशासनाने नमुना-जे नुसार बजावलेल्या नोटिसीत स्पष्ट केले आहे की, ‘कॅटलायझर क्लासेस’ने UDCPR-२०२० आणि NBC (National Building Code) च्या नियमांनुसार आवश्यक बदल ७ दिवसांच्या आत पूर्ण करावेत. तसेच या सुधारणांबाबतचा अहवाल तात्काळ मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे.

मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी या नोटिसीद्वारे बजावले आहे की, दिलेल्या मुदतीत त्रुटींची पूर्तता न झाल्यास अधिनियमाच्या कलम ८ नुसार कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने संबंधित इमारतीचा वीज आणि पाणीपुरवठा तात्काळ खंडित केला जाईल आणि इमारत सीलबंद करण्यात येईल.

नगर परिषदेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील इतर ट्युशन क्लासेस आणि व्यावसायिक इमारतींच्या मालकांचे धाबे दणाणले आहेत. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या कोणत्याही त्रुटी खपवून घेतल्या जाणार नसल्याचा संदेश या निमित्ताने प्रशासनाने दिला आहे.

Popular Articles