spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सोशल मीडियावर ‘भाईगिरी’ भोवली! चाकूने केक कापणाऱ्यावर भंडारा पोलिसांची धडक कारवाई

हंसराज भंडारा :- वाढदिवसाच्या पार्टीत सार्वजनिक ठिकाणी मोठ्या लोखंडी चाकूने केक कापून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीवर भंडारा पोलिसांनी ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत धडक कारवाई केली आहे. ही कारवाई टाकळी येथे करण्यात आली असून, संबंधित व्यक्तीवर भारतीय हत्यार कायद्यान्वये (Arms Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीने वाढदिवस साजरा करताना बेकायदेशीररीत्या मोठ्या लोखंडी चाकूचा वापर केल्याचे आणि त्याचे फोटो अपलोड केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. अशा कृत्यांमुळे समाजात आणि विशेषतः तरुणांमध्ये चुकीचा संदेश जाऊन दहशत निर्माण होण्याची शक्यता असते. या घटनेची गंभीर दखल घेत, जिल्हाभरात राबविण्यात येत असलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ मोहिमेअंतर्गत पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे टाकळी येथे धाड टाकून या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तरुणांना सक्त ताकीद दिली आहे की, वाढदिवसात तलवार किंवा मोठ्या चाकूने केक कापणे व त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारे दहशत माजवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन भंडारा पोलिसांनी केले आहे.

Popular Articles