नागपूर :- महानगरपालिकेतील दि. ०१/११/२००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कार्यरत अधिकारी/ कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शासन निर्णय वित्त विभाग दिनांक १९/०८/२०१९ नुसार दिनांक ०१/०४/२०१९ पासून मनपा हिस्सा १० टक्के वरुन १४ टक्के करण्यात यावा असे निर्देश होते. त्यानुसार सदर बाब धोरणात्मक स्वरुपांची असल्याने ऑगस्ट २०२१ मध्ये तत्कालीन आयुक्त यांच्यामार्फत सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव ठेवण्यासंदर्भात वित्त विभागामार्फत नस्ती सादर करण्यात आलेली होती. तथापि सदर बाबीस तत्कालीन आयुक्त यांची मंजूरी प्राप्त झाली नाही.
तद्नंतर शासन निर्णय नगर विकास विभाग दिनांक २२/०२/२०२२ नुसार सप्टेंबर २०२४ मध्ये तत्कालीन आयुक्त यांचेकडे मनपा हिस्सा १० टक्के वरुन १४ टक्के करण्याबाबत नस्ती पुनश्च सादर केली असता, सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यावर सादर करावे. तोपर्यंत १० टक्के अंशदान सुरु ठेवावे असे आयुक्त यांनी निर्देशित केले.
वरील प्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यावर पुनश्च नस्ती सादर करण्यांत आली असता मनपाच्या आर्थिक स्थितीचा विचार करुन तत्कालीन मा. आयुक्त/ प्रशासक यांनी ठराव क्रमांक ८२/ मनपा/ प्रशासक, दिनांक ०६/१२/२०२५ नुसार मनपाचा (सहभाग) अंशदान दि. ०१/०४/२०२५ पासून १० टक्के वरुन १४ टक्के करण्याबाबत मंजूरी प्रदान केली त्यानुसार सद्यास्थितीत कार्यवाही सुरु आहे.
उपरोक्तपणे मनपाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन निर्णय घेण्यात आलेला असून, यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक घोटाळा झालेला नाही. तरी याद्वारे वरीलप्रमाणे प्रसिद्ध झालेल्या चुकीच्या बातमीचे खंडन करण्यात येत आहे.
(सदाशिव शेळके)
प्रमुख लेखा व वित्त अधिकारी महानगरपालिका, नागपूर








