– कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा भव्य सत्कार; सेवाभावी कार्याला मानाचा मुजरा
कामठी :- राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या निमित्ताने डिफेन्स सिव्हिलियन को-ऑर्डिनेशन कमिटी, कामठीच्या वतीने कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा विशेष सत्कार करून त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाला मानवंदना देण्यात आली. समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साह, आदर आणि आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमात डॉ. ए. ए. काळे आणि डॉ. विवेक कुल्हाडे यांच्यासह हॉस्पिटलमधील सर्व तज्ज्ञ डॉक्टरांचा पुष्पगुच्छ व मिठाई देऊन गौरव करण्यात आला. उपस्थितांनी डॉक्टरांना राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देत त्यांच्या रुग्णसेवेतील समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि मानवतावादी दृष्टिकोनाचे कौतुक केले.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “डॉक्टर हे समाजाचे खरे जीवनदाते आहेत. संकटाच्या प्रत्येक क्षणी ते स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार न करता रुग्णांच्या सेवेसाठी धावून जातात. त्यांच्या निःस्वार्थ सेवेमुळे असंख्य कुटुंबांना नवजीवन मिळते. त्यामुळे डॉक्टरांविषयीचा आदर आणि कृतज्ञता प्रत्येक नागरिकाने जपली पाहिजे.”
या कार्यक्रमाला डिफेन्स सिव्हिलियन को-ऑर्डिनेशन कमिटीचे अध्यक्ष सत्यनारायण भारती, सचिव गौतम तपासे, तसेच विनोद वाघमारे, रंजन, चंद्रशेखर, दीपक, बबलू पांडे, प्रल्हाद आणि इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी डॉक्टरांच्या सेवाभावी कार्याला सलाम करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून समाजातील वैद्यकीय क्षेत्राबद्दलचा आदर आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली. डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.








