spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खमाटा येथे कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित; १५ जुलैला चक्काजाम आंदोलनाचा इशारा चार दिवसांपासून वीज नसल्याने रोवणीची कामे खोळंबली

हंसराज,भंडारा :- जिल्ह्यातील मौजा खमाटा (टाकळी) येथील कृषी पंपांचा वीज पुरवठा गेल्या चार दिवसांपासून खंडित असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सध्या भात रोवणीची कामे सुरू असतानाच वीज पुरवठा बंद झाल्याने पिकांचे नुकसान होत असून, या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास १५ जुलै रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.

समितीने प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार, खमाटा परिसरातील शेतांमध्ये सध्या भात रोवणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अशा वेळी कृषी पंपांना होणारा वीज पुरवठा गेल्या चार दिवसांपासून सातत्याने बंद ठेवण्यात आला आहे. या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची असल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या अशा भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या भागात अनेक वीज खांब वाकलेल्या अवस्थेत असून तारा एकमेकांना स्पर्श करत आहेत. तसेच अनेक वीज डीपी उघड्यावर असून तेथे योग्य व्यवस्था नसल्याने मानवी जीवनास व गुरांना धोका निर्माण झाला आहे. वीज विभागाने तत्काळ या समस्यांचे निराकरण करून शेतकऱ्यांच्या हक्काची वीज पूर्ववत करावी आणि खंडित असलेल्या चार दिवसांच्या बदल्यात २४ तास वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोथुर्णा रोड, नवीन गावठाण पुनर्वसन येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीला शासन आणि वीज विभाग जबाबदार राहील, असे चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे आणि पुरुषोत्तम गायधने यांनी निवेदनात नमूद केले आहे. या संदर्भातील निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि वीज विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Popular Articles