किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विरशी, केंद्र-निमखेडा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ निमित्त प्रवेशोत्सव, शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक २ व पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, टाळ्यांच्या कडकडाटात, रंगीबेरंगी फुगे, स्वागत टोपी व पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात पालकांना शाळेत राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, क्रीडा, विज्ञान, डिजिटल शिक्षण, इंग्रजी संवाद, वाचन संस्कृती व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात आली. पालक-शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि पालकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत भगवान सोनवणे होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख रामेश्वर भक्तवर्ती उपस्थित होते. तसेच सरपंचा लक्ष्मी चौधरी, उपसरपंच पंकज वाणी, शिवशंकर बरबटे, हर्षल खडसे,पल्लवी सोनावणे, मुख्याध्यापक गौतम उदेभान गणवीर, पदवीधर शिक्षक नितीन कदम, सहाय्यक शिक्षक मनोज भगत,अन्नपूर्णा वंजारी, शालेय पोषण आहाराच्या स्वयंपाकी कविता कांबळे व मदतनीस सविता शेंद्रे उपस्थित होते.
कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षाची प्रेरणादायी सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.




