– भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी सरकारवर ओढले ताशेरे
हंसराज,भंडारा :- NEET आणि TET परीक्षांमधील सततच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. या गोंधळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय आणि राज्य शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, वैद्यकीय शिक्षणासाठीची NEET परीक्षा आणि राज्यातील शिक्षकांसाठीची TET परीक्षा, या दोन्ही स्तरावर पेपरफुटीचे सत्र सुरू असल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शिक्षण व्यवस्थेच्या या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप पडोळे यांनी केला आहे. शेतकरी आणि कामगार वर्ग कर्ज काढून आपल्या मुलांना शिकवतो,
मात्र परीक्षा घेणाऱ्या यंत्रणांच्या अपयशामुळे या मेहनतीवर पाणी फेरले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वारंवार परीक्षा रद्द होणे किंवा पेपर फुटल्यामुळे विद्यार्थी तीव्र मानसिक तणावाखाली असून, ही परिस्थिती शिक्षण क्षेत्रासाठी कलंक असल्याचे पडोळे यांनी नमूद केले. परीक्षा घेणाऱ्या मोठ्या संस्था आणि राज्यातील परीक्षा परिषद गोपनीयतेचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी पडोळे यांनी काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये NEET आणि TET पेपरफुटीची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करावी, परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणावी आणि दोषींवर थेट ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करून त्यांना तुरुंगात डांबावे, या मागण्यांचा समावेश आहे. सरकारने यावर ठोस पावले न उचलल्यास विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रशांत पडोळे यांनी दिला आहे.




