spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

– जवाहरनगर पोलिसांनी शहापूर शिवारात सापळा रचून दोन आरोपींना घेतले ताब्यात

हंसराज,भंडारा :- जिल्ह्यात सुगंधित तंबाखूची अवैध तस्करी करणाऱ्यांविरुद्ध जवाहरनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत पोलिसांनी ११ लाख २७ हजार ७३० रुपयांच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक केली असून एक चारचाकी वाहन जप्त केले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी रात्री ११:५४ च्या सुमारास नागपूरकडे जाणाऱ्या एका स्कॉर्पिओ गाडीतून अवैध तंबाखूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवाहरनगर पोलिसांनी शहापूर येथे  सापळा रचला. नागपूरच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ गाडी (क्र. MH27AR9029) येताना दिसताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने पाठलाग करून पंचांच्या समक्ष गाडीला ताब्यात घेतले.

वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये ७५ हजार रुपये किमतीची सुगंधित तंबाखूची पाकिटे, ५० हजार रुपये किमतीची बारीक कट केलेली सुपारी आणि २,७३० रुपयांचा चुना व पन्नी असे साहित्य आढळून आले. पोलिसांनी तंबाखूजन्य पदार्थांसह १० लाख रुपये  किमतीची स्कॉर्पिओ गाडी, असा एकूण ११ लाख २७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आशिष शंकर ठाकरे (वय २८) आणि मंगेश सदानंद धांडे (वय २५), दोन्ही राहणार तोंडली, ता. मौदा, जि. नागपूर या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २७५, १२३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात प्रदीप नीलकंठ चुटे, पोलीस अंमलदार नारनवरे, गभने, चापोने बोंदरे, पोलीस हवालदार कडव, बोरकर आणि चालक याडमाचे यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस करत आहेत.

Popular Articles