spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पावसाची हुलकावणी, बोनसकडे खिळल्या नजरा, शेतकऱ्यांना प्रतीक्षा !

– कष्टाचा घाम गाळूनही हक्काच्या बोनस मिळेना?

– शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये बोनस द्या 

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- जिल्ह्यात २०२५-२६ च्या खरीप हंगामातील धान खरेदीची प्रक्रिया आटोपली असली, तरी दरवर्षी हक्काने मिळणाऱ्या बोनससाठी यंदा प्रतीक्षा धानउत्पादक शेतकऱ्यांना कराती लागत आहे. शासनाने यंदा बोनसची घोषणा तर केली, मात्र खरीप हंगामाच्या तोंडावर अद्याप प्रशासकीय पातळीवर कोणतीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे कष्टाचा घाम गाळूनही हक्काच्या बोनस मिळत नसल्याने लाखांवर शेतकरी विवंचनेत आहेत. रामटेक, मौदा, पारशिवनी तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी आज गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेला धान बोनस अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. नवीन खरीप हंगाम सुरू असताना खते, बियाणे, मजुरी आणि इतर शेतीकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असताना शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी, रामटेक यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रामटेक विधानसभा क्षेत्राच्या वतीने माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी निवेदन दिले. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५०००० रुपये बोनस तातडीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावा, तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेली प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, आदिवासी भागातील धानाचे प्रलंबित चुकारे तत्काळ अदा करावेत तसेच शेतकऱ्यांना सुरळीत पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. येत्या ७ ते १० दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा न झाल्यास समस्त धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील. यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसीचे जिल्हाध्यक्ष रमेश कारामोरे सह पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles