– ८० हजारांवर अर्जांची नोंदणी
नागपूर :- पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा मृगबहार २०२६ योजनेला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, १४ जुलैपर्यंत योजनेत ८१,५२३ विमा अर्ज नोंदणी झाली आहे. मागील वर्षी याच योजनेत ५२,१२१ अशी विमा अर्जांची संख्या होती.
या योजनेत अधिसुचित फळ पिकांसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी कृषी विभागाने विशेष प्रयत्न केले होते. मृगबहारमध्ये द्राक्ष, पेरू, लिंबू, सीताफळ, मोसंबी, संत्रा, डाळींब, चिकू या पारंपरिक पिकांबरोरच अंजीर व हळद या पिकांचा यंदा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. या योजनेतील पिकांसाठी असलेली प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम अशी- कंसात साधारण ५ टक्के नुसार प्रति हेक्टर विमा हप्ता रुपयांमध्ये- १) द्राक्ष ३,८०,००० रु. (१९,००० रु.), २) पेरू – ७०,००० (३५०००), ३) लिंबू- ८०,००० (४०००), ४) सीताफळ – ७०,००० (३५००), ५) मोसंबी- १,००,००० (५०००), ६) संत्रा – १,००,००० (५,०००), ७) डाळींब – १,६०,००० (८०००), ८) चिकू – ७०,००० (३५००), ९) अंजीर- १,६०,००० (८,०००), १०) हळद – १,८०,००० रु. (९००० रु.).
यात प्रामुख्याने हळद पिकासाठी सर्वाधिक ४१,५९५ विमा अर्ज असून, त्या खालोखाल संत्रा – १०२३७, डाळींब ८०६३ असे अर्ज आहेत.
हळद पिकासाठी लागू केलेल्या विमा योजनेला परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. अंजीर व सीताफळ या पिकांसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेतील सहभाग NCIP या online पोर्टलच्या माध्यमातून होतो. योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांनी digital croop survey न चुकता करावा, जेणेकरून त्यांचा विमा अर्ज अपात्र होणार नाही, असे कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार आवटे यांनी केले आहे.








