नागपूर :- समाजकार्य क्षेत्रातील तज्ज्ञ, ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ तथा रोटेले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. चंदनसिंह रोटेले यांना आदरांजली म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात “समाजकार्य भूषण डॉ. चंदनसिंह रोटेले स्मृती सुवर्णपदक” सुरू करण्यासाठी रोटेले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष डॉ. केदारसिंह रोटेले यांनी ३ लाख रुपयांचा धनादेश विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द केला.
स्व. डॉ. चंदनसिंह रोटेले यांच्या ६९ व्या जयंतीनिमित्त ( ६ जुलै ) आयोजित कार्यक्रमात हा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी रोटेले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. काजोल रोटेले, संचालिका किरण रोटेले, माजी सिनेट सदस्य मधू रोटेले तसेच संचालक प्रा. अमोलसिंह रोटेले उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. विजय खंडाळ, समाजकार्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. नरेश कोलते तसेच ऑरेंज सिटी कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम उपस्थित होते. यावेळी डॉ. केदारसिंह रोटेले यांनी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांना स्व. डॉ.चंदनसिंह रोटेले यांनी समाजकार्य व शिक्षण क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाची माहिती दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांना समाजकार्य क्षेत्रात प्रेरणा मिळावी, या उद्देशाने “समाजकार्य भूषण डॉ. चंदनसिंह रोटेले स्मृती सुवर्णपदक” सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. हे सुवर्णपदक शैक्षणिक गुणवत्ता आणि समाजकार्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सदिच्छा भेटी दरम्यान विद्यापीठाचे शैलेन्द्रसिंह राठोड, प्रा. कल्पना मुकुंदे, डॉ. शालिनी तोरे, डॉ. सुलोक रघुवंशी, मंगलप्रसाद रहांगडाले, श्री ठाकरे तसेच रोटेले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.








