spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोहाडी पंचायत समितीत निष्ठा आणि शब्दपूर्तीचा विजय चरण वाघमारे समर्थकांच्या बिनशर्त पाठिंब्याने बाणा सव्वालाखे सभापती, आशा बोंद्रे उपसभापती

हंसराज भंडारा :- राज्यातील राजकारणात पक्षांतर, फोडाफोडी आणि सत्तेसाठी होणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोहाडी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत निष्ठा, विश्वास आणि दिलेला शब्द पाळण्याचे उदाहरण समोर आले आहे. माजी आमदार चरण वाघमारे यांच्या सहा समर्थक सदस्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता बाणा सव्वालाखे यांना सभापतीपदासाठी, तर आशा बोंद्रे यांना उपसभापतीपदासाठी बिनशर्त पाठिंबा दिला.

मोहाडी पंचायत समितीत एकूण १४ सदस्य असून मागील निवडणुकीत चरण वाघमारे समर्थक आठ सदस्य निवडून आले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे सहा सदस्य विजयी झाले होते. सुरुवातीला चरण वाघमारे यांचा गट एकसंघ राहिला. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी जगदीश शेंडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर बहुमतासाठी रेवानंद देवा चकोले यांचाही सत्ताधारी गटात समावेश करण्यात आला. त्यानंतर जगदीश शेंडे यांची सभापती, तर रेवानंद चकोले यांची उपसभापतीपदी निवड झाली.

दरम्यान, सत्ताधारी गटातील काही सदस्यांनी सभापती व उपसभापती यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. पंचायत समिती सदस्य बाणा सव्वालाखे यांच्या नेतृत्वात चार सदस्यांनी चरण वाघमारे व त्यांच्या सहा समर्थक सदस्यांशी चर्चा करून सभापती आणि उपसभापती यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला. हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्यानंतर जगदीश शेंडे आणि रेवानंद चकोले यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.

अविश्वास प्रस्तावानंतर पूर्वी गट सोडून गेलेले काही सदस्य पुन्हा चरण वाघमारे गटाशी संपर्कात आल्याने सत्ता पुन्हा मिळवण्याची संधी निर्माण झाली होती. मात्र अशा परिस्थितीतही चरण वाघमारे आणि त्यांच्या सहा समर्थक सदस्यांनी दिलेल्या शब्दाशी तडजोड केली नाही. कोणत्याही पदाची, सत्तेची अथवा अन्य अपेक्षा न ठेवता त्यांनी बाणा सव्वालाखे आणि आशा बोंद्रे यांना बिनशर्त पाठिंबा देत त्यांची अनुक्रमे सभापती व उपसभापतीपदी निवड होण्यासाठी सहकार्य केले.

या निवडीनंतर चरण वाघमारे यांच्या राजकीय भूमिकेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी २०२१-२२ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सत्तास्थापनेच्या वेळीही त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिलेला शब्द पाळत सत्ता स्थापनेसाठी सहकार्य केले होते. त्यावेळीही राजकीय नुकसानाची शक्यता असतानाही त्यांनी आपल्या भूमिकेशी तडजोड केली नव्हती.

Popular Articles