यवतमाळ :- पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेअंतर्गत सहभागी असलेल्या बाभूळगाव तालुक्यातील राणी येथील उडान महिला शेतकरी गटास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळ यांनी प्रत्यक्ष शेतभेट देऊन गटाच्या कार्याची पाहणी केली.
यावेळी त्यांनी महिलांशी संवाद साधून सामूहिक शेतीचे नियोजन, पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धेअंतर्गत सुरू असलेले उपक्रम, खरीप हंगामातील पीकस्थिती तसेच आगामी रबी हंगामाच्या नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत महिलांना शाश्वत शेती, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय निविष्ठांचा वापर आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले.
हा गट १६ महिला सदस्यांचा असून २४ एकर क्षेत्रावर सामूहिक शेती करीत आहे. गटामार्फत दशपर्णी अर्क निर्मिती, निंबोळी संकलन, गांडूळ खत बेड, एकत्रित निविष्ठा खरेदी, उगम क्षमता चाचणी, रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया तसेच बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी यांसारख्या विविध मानक कार्यपद्धती प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
याप्रसंगी उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर, जिल्हा व्यवस्थापक (उपजीविका), जिल्हा व्यवस्थापक (विपणन), तालुका अभियान व्यवस्थापक तसेच उमेद अभियानाची टीम उपस्थित होती. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी गटाच्या कार्याचे कौतुक करून महिला शेतकऱ्यांना सामूहिक शेती अधिक सक्षम व शाश्वत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.








