spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राहुल गांधींसह काँग्रेस नेते व युवकांवरील दडपशाहीच्या निषेधार्थ नगरसेवक, पश्चिम नागपूर काँग्रेस नेते आक्रमक; धर्मेंद्र प्रधान व पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी

नागपूर :- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते व युवकांनी नवी दिल्ली येथे केलेल्या शांततापूर्ण लोकशाही आंदोलनाचे पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या दमनाच्या निषेधार्थ पश्चिम नागपूर काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी जुना काटोल नाका चौक येथे जोरदार निदर्शने करत केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

यावेळी आंदोलकांनी NEET प्रश्नपत्रिका गळती प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या गंभीर अन्यायाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेते व युवकांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनादरम्यान वक्त्यांनी सांगितले की, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. हा अधिकार दडपण्याचा कोणालाही अधिकार नाही. विद्यार्थी व युवकांच्या भविष्याशी खेळणारे, युवकविरोधी धोरणे राबविणारे आणि “असत्य का सौदागर” म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीचा आवाज कितीही दडपण्याचा प्रयत्न करीत असले तरी जनतेचा संघर्ष थांबवू शकणार नाहीत. NEET प्रश्नपत्रिका गळतीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचे अपरिमित नुकसान झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून तात्काळ हटविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

या निदर्शनात नागपूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते संजय महाकळकर, नगरसेवक प्रमोदसिंग ठाकूर, अतुल कोटेचा, शैलेश पांडे, वसीम खान, विवेक निकोसे, प्रगती रोहित यादव, मेरीस्टेला देवा उसरे, सुनीता दीपक तबाने, सरस्वती विजय सलामे, सीमा अरुण दावरे, मंजू गणेश चाचेरकर, अभिजीत प्रभुकांत झा तसेच पश्चिम नागपूर काँग्रेसचे पदाधिकारी रिझवान खान रूमवी, रोहित यादव, स्नेहा निकोसे, नागेश राऊत, नितीन महुरे, रवींद्र भावे, लंकेश उईके, टिंकू कांबळे आणि मोठ्या संख्येने काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आंदोलकांनी इशारा दिला की, केंद्र सरकारने विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचे, लोकशाही मूल्यांची पायमल्ली करण्याचे आणि युवकांच्या भवितव्याशी खेळण्याचे धोरण तात्काळ थांबवावे. अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारेल आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी अधिक व्यापक संघर्ष छेडेल.

Popular Articles