spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तूमसरमध्ये गुन्हेगारांचे धाबे दणाणले; अवैध धंदे करणाऱ्या सात जणांना दोन वर्षांसाठी तीन जिल्ह्यांतून तडीपार

हंसराज,भंडारा तूमसर :- शहर आणि परिसरात अवैध व्यवसायांच्या माध्यमातून दहशत माजवणाऱ्या आणि कायद्याचा भंग करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी तूमसर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. अवैध दारू विक्री, गोमांस तस्करी, जुगार आणि वाळू चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वारंवार सक्रिय असणाऱ्या सात कुख्यात गुन्हेगारांना भंडारा, गोंदिया आणि नागपूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार (हद्दपार) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी (SDM) गणेश दिघे यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्याने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तूमसर शहरातील विविध वॉर्डांतील सात जणांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल होते. यामध्ये शाहिद बशीर शेख (दत्तात्रय नगर, तूमसर) – ५ गुन्हे, साजिद बशीर शेख – ७ गुन्हे, ईरफानअली हसनअली सैय्यद – ४ गुन्हे (तिघेही अवैध गोमांस विक्री प्रकरण), रविशंकर थोटे (दत्तात्रय वार्ड) – ६ गुन्हे (अवैध हातभट्टी दारू), ऋषी टेकलाल वाघमारे (आंबेडकर वार्ड) – ६ गुन्हे, मुकेश फुलचंद कुंभारे (गोवर्धन नगर) – ५ गुन्हे (जुगार अड्डा) आणि सुरेंद्र फत्तु पिपलधरे (श्रीराम नगर) – ३ गुन्हे (वाळू चोरी, खून, जुगार) यांचा समावेश आहे. या आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करून जनहितासाठी आणि शांतता सुव्यवस्थेसाठी त्यांना हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही कायदेशीर कारवाई महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब), ५६(ब)(ब), ५६(अ)(ब) आणि कलम ५७(अ)(५) अन्वये करण्यात आली आहे. तूमसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी या गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. त्यावर सुनावणी होऊन या ७ आरोपींना भंडारा जिल्ह्यातून तातडीने हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले असून १५ दिवसांच्या प्राथमिक कालावधीसाठी त्यांना जिल्ह्याबाहेर रवाना करण्यात आले आहे.

सदर धडक कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन आणि अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात उपविभागीय पोलीस अधिकारी तूमसर शिवम विसापुरे, पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव (डी.बी. पथक), पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम, पो. हवा. शरद रामटेके, पो. शि. झंझाड, वळदे, गिरीपुंजे, बावने, दमाहे आणि चौधरी यांचा समावेश होता. पोलिसांच्या या कारवाईमुळे तूमसरमधील अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.