spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाच्या निषेधार्थ विदर्भ युवा क्रांती संघटनेचे पवनीत आंदोलन; राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदारांमार्फत निवेदन

हंसराज,भंडारा पवनी :- दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जाच्या निषेधार्थ तसेच पेपर लीक प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या खेळाविरोधात आज विदर्भ युवा क्रांती संघटनेच्या वतीने पवनी येथे शांततापूर्ण आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

या आंदोलनात विदर्भ युवा क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच समता पतसंस्थेचे कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सहभाग नोंदविला.

आंदोलनाची सुरुवात महात्मा गांधी चौक येथील महात्मा गांधी स्मारकासमोर सभेने झाली. यावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जाची पार्श्वभूमी, पेपर लीक प्रकरणांमुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसान आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार याबाबत जनतेला माहिती देण्यात आली. विविध वक्त्यांनी आपली मते व्यक्त करत विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा तीव्र निषेध नोंदविला.

यावेळी विदर्भ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक हर्षल वाघमारे यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “गरीब कुटुंबातील विद्यार्थी वर्षभर अथक मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र वारंवार होणाऱ्या पेपर लीकमुळे त्यांच्या कष्टावर पाणी फिरते. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मटक्याचा नंबरही कधी लीक होत नाही, म्हणजे बेकायदेशीर व्यवस्थेतही काही प्रमाणात गोपनीयता राखली जाते; पण संपूर्ण शासकीय यंत्रणा हातात असूनही वारंवार पेपर लीक होतात, हे अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारे आहे.”

विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जाचा निषेध करताना त्यांनी पुढे म्हटले की, “शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला अमानुष लाठीचार्ज हा लोकशाही मूल्यांना आणि संविधानिक अधिकारांना धक्का देणारा आहे. अशा प्रकारची दडपशाही लोकशाहीला काळिमा फासणारी आहे.”

सभेनंतर महात्मा गांधी चौक येथून शांततापूर्ण मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा महात्मा गांधी चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – पोलीस स्टेशन, पवनी – छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयात पोहोचला.

पोलीस स्टेशनसमोर दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जाचा निषेध म्हणून आंदोलनकर्त्यांनी टाळ्या वाजवून प्रतीकात्मक निषेध नोंदविला. संपूर्ण मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या समर्थनार्थ तसेच पेपर लीक प्रकरणांवरील कारवाईसाठी विविध घोषणा देण्यात आल्या. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणाही मोठ्या प्रमाणावर देण्यात आल्या.

मोर्चाची सांगता तहसील कार्यालयात झाली. तेथे महामहीम राष्ट्रपती यांच्या नावे तहसीलदार, पवनी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाची उच्चस्तरीय चौकशी, पेपर लीक प्रकरणांवर कठोर कारवाई, विद्यार्थ्यांना न्याय देणे आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून लोकशाही मार्गाने विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

Popular Articles