spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा एल्गार; राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

हंसराज, भंडारा :- केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या नेत्यांचा आवाज दडपला जात असल्याचा आरोप करत, आज भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना झालेली अटक, विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्ज आणि ‘नीट’ (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या विरोधात माजी मंत्री तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा जनआक्रोश जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आयोजित हा मोर्चा स्थानिक विश्रामगृह येथून सुरू झाला. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणाऱ्या आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्या धोरणांचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

‘लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम’ – यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “देशाच्या तरुणांच्या भविष्याशी खेळ खेळला जात आहे. जेव्हा विद्यार्थी आणि विरोधी पक्षाचे नेते न्यायाची मागणी करतात, तेव्हा त्यांना लाठीचार्ज आणि अटकेचा सामना करावा लागतो. ही लोकशाहीची हत्या असून हुकूमशाहीचा कळस आहे. काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून हा संघर्ष शेवटपर्यंत सुरूच राहील.”

जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढताना सांगितले की, “पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी सरकार आंदोलन चिरडण्याचे काम करत आहे. मात्र, आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करू.”

विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाची उच्चस्तरीय चौकशी करावी, राहुल गांधी व अखिलेश यादव यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील खऱ्या सूत्रधारांना अटक करावी आणि स्पर्धा परीक्षांची पारदर्शकता टिकवून विद्यार्थ्यांच्या भविष्याचे रक्षण करावे, अशा मागण्यांचा समावेश आहे.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती या आंदोलनात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांच्यासह धनराज साठवणे, विकास राऊत, प्यारेलाल वाघमारे, जयश्री बोरकर, स्वाती वाघाये, पूजा हजारे, पूजा बाबरे, रिजवान काझी, नाहीद खान, इमरान पटेल, वैभव मेंडे, जनार्दन निंबारते, सोनू कोटवानी, तसेच युवक काँग्रेस, एनएसयूआय, महिला काँग्रेस आणि सेवा दलाचे सर्व फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चाने जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे.

Popular Articles