spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पवनीत राष्ट्रवादीचा ‘दिमाखदार सेवायज्ञ’; अजितदादांच्या जयंतीनिमित्त वंचितांना मायेची ऊब आणि चिमुकल्यांना शैक्षणिक बळ!

हंसराज,भंडारा पवनी :- राजकारणापलीकडे जाऊन सर्वसामान्यांच्या सुख-दुःखाशी नाळ जोडणारा ‘लोकनेता’ ही स्व. अजितदादा पवार यांची ओळख आजही कायम आहे. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पवनी तालुक्याच्या वतीने केवळ उत्सव साजरा न करता, एक प्रभावी ‘सेवायज्ञ’ राबवण्यात आला. फुटकळ घोषणाबाजीला फाटा देत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृद्धाश्रमाला अन्नधान्याची मदत आणि भव्य वृक्षारोपण अशा विधायक उपक्रमांतून दादांना कृतीशील अभिवादन करण्यात आले.

शालेय साहित्याचे वाटप आणि संघर्षाची शिदोरी या सामाजिक चळवळीची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिंदपुरी येथून झाली. सुरुवातीला अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय सावरबांधे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दादांच्या ध्येयवादी जीवनाचा पट उलगडला. “दादांचा करारीपणा आणि समाजकार्याची तळमळ हीच खरी प्रेरणा आहे,” असे सांगत मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साधन मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला.

वृद्धाश्रमात माणुसकीचा ओलावा सिंदपुरी येथील ‘अपना घर’ वृद्धाश्रमात अत्यंत भावनिक सोहळा पार पडला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ धान्य वाटप न करता, वृद्धाश्रमातील आजी-आजोबांशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी वृद्धाश्रमाला अन्नधान्य व जीवनावश्यक किराणा मालाची मदत सुपूर्द करण्यात आली. तसेच या ज्येष्ठांच्या आशीर्वादाची सावली सदैव राहावी, या उद्देशाने परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

रुयाळ येथे पर्यावरण संवर्धनाचा संकल्प रुयाळ येथील महासमाधी भूमी बौद्धविहार येथे तथागत गौतम बुद्धांना वंदन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यकर्त्यांनी एकत्र येत बौद्धविहार परिसरात वृक्षारोपण केले. निसर्गाप्रती आपली जबाबदारी ओळखून भावी पिढीला शुद्ध हवा मिळावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या यशस्वी सेवायज्ञात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय सावरबांधे, विधानसभा अध्यक्ष लोमेश वैद्य, शहराध्यक्ष शैलेश मयूर, जिल्हा बँक संचालक चेतक डोंगरे, उपाध्यक्ष जितुभाऊ नखाते, नगरसेवक नीलकंठ टेकाम, किसान सेल अध्यक्ष छोटु बाळबुधे, महिला अध्यक्ष जयशीला भुरे, युवक अध्यक्ष हेमंत मेनवाडे, माजी सभापती हंसा खोब्रागडे, ललित खोब्रागडे, दुधराम बावनकर, संविधान नवनांगे, अनिकेत बुक्कावन, सागर मेनवाडे, चंद्रहास पचारे, भोला पचारे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका कोकणे , हिंगोले , सिंधू मेनवाडे, तारकण्या बोरकर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चरण पलवार यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.