spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नैसर्गिक संसाधनांवर आदिवासी बांधवांचाच पहिला हक्क – पालकमंत्री संजय राठोड

–  क्रांतिवीर शामादादा कोलाम यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

– आदिवासी संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि भव्य लाभार्थी मेळावा संपन्न

– पालकमंत्र्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव व लाभार्थ्यांना धनादेश वितरित

यवतमाळ :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा व क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटना, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिवीर आदिवासी जननायक शामादादा कोलाम यांच्या २७ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आदिवासी संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि भव्य लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शनिवारी १ ऑगस्ट रोजी कळंब तालुक्यातील दत्तापूर (निरंजन माहूर) येथे संपन्न झाला. यावेळी क्रांतिवीर शामादादा कोलाम यांना मान्यवरांनी अभिवादन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके उपस्थित होते. तसेच खासदार संजय देशमुख, पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे, पुसदचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटनेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात बोलताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, “नैसर्गिक संसाधनांवर आदिवासी बांधवांचाच पहिला हक्क आहे. शासन आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे.”

कार्यक्रमादरम्यान विशेष ‘रानभाजी महोत्सव’ आयोजित करून परिसरातील नागरिकांना आदिवासींच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची आणि आरोग्यादायी रानभाज्यांची माहिती देण्यात आली. स्थानिक कलावंतांना आपली कला सादर करण्यासाठी या व्यासपीठाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात आली.

मेळाव्यात विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देऊन लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभांचे वाटप करण्यात आले. यामध्ये महिला सक्षमीकरण, कृषी संलग्न व्यवसाय, हॉटेल-ढाबा, तसेच लघुउद्योगांसाठी मंजूर करण्यात आलेल्या कर्जाचे धनादेश लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. याशिवाय, आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सांस्कृतिक भवन इमारतीचे भूमिपूजन

पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते निरंजन दत्तापूर, ता. कळंब येथे आदिम जमातीचे क्रांतिकारक शामादादा कोलम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सांस्कृतिक भवनासाठी मंजूर ₹१ कोटींच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

समाजजागृती, स्वाभिमान आणि आदिम समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे क्रांतिकारक शामादादा कोलम यांचे कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा आणि संघर्षमय जीवनाचा आदर्श कायम स्मरणात राहावा, तसेच त्यांच्या स्मृतींना साजेशी विकासकाम या परिसरात उभे रहावे या भावनेतून या सांस्कृतिक भवनाची निर्मिती होत असून या माध्यमातून स्थानिक सांस्कृतिक परंपरा, सामाजिक उपक्रम आणि भावी पिढ्यांसाठी एक सक्षम केंद्र उभे राहील, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांनी यावेळी व्यक्त केला.

Popular Articles