spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

येरखेड्यात स्व. गणपतराव वस्ताद आखाड्यात गुरुपौर्णिमा पर्व उत्साहात साजरे

– ज्येष्ठ मार्गदर्शक बाजीराव ईरपाचे यांचा नगराध्यक्ष राजकिरण बर्वे यांच्या हस्ते सत्कार

कामठी :- कामठी तालुक्यातील येरखेडा येथील ऐतिहासिक स्वर्गीय गणपतराव वस्ताद व्यायाम शाळा (आखाडा) येथे गुरुपौर्णिमा पर्व भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात येरखेडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजकिरण बर्वे यांच्या हस्ते वीर बजरंग बलीची विधिवत पूजा-अर्चना करून झाली.

येरखेडा गावचे मालगुजार पाटील स्वर्गीय सदाशिवराव पाटील यांनी सुमारे ७५ वर्षांपूर्वी या व्यायामशाळेची स्थापना केली होती. या आखाड्यातून कुस्ती, मलखांब, दांडपट्टा तसेच आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण अनेक तरुण-तरुणींना देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या बळावर अनेक युवकांनी विविध शासकीय सेवांमध्ये स्थान मिळवून आखाड्याची परंपरा आणि गौरव उंचावला आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त प्रशिक्षण देणाऱ्या ज्येष्ठ मार्गदर्शकांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जात असून, यावर्षी व्यायामशाळेचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाजीराव ईरपाचे यांचा नगराध्यक्ष राजकिरण बर्वे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष राजकिरण बर्वे म्हणाले की, “आजच्या तरुणांनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती, मलखांब आणि पारंपरिक आखाडा संस्कृतीचे प्रशिक्षण घेऊन शारीरिक, मानसिक व नैतिकदृष्ट्या सक्षम बनावे. भारतीय पारंपरिक क्रीडांचा वारसा जपणे ही काळाची गरज आहे आणि त्यातून समाजात आदर्श स्थान निर्माण करता येते.”

या कार्यक्रमाला अनुराग भोयर, व्यायामशाळेचे अध्यक्ष बबनराव काळे, नगरसेवक राजेश बनसिंगे, माजी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी, अतुल सलाम, प्रशांत काळे, नितीन ईरपाचे, सुशांत सलाम, नथू चिंचोलकर, निर्मल वानखेडे, अक्षय चिंचोलकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, खेळाडू व कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन अतुल सलाम यांनी केले, तर नितीन ईरपाचे यांनी उपस्थितांचे आभार मानले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरु-शिष्य परंपरेचा गौरव, पारंपरिक व्यायाम संस्कृतीचे जतन आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.