spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आईच्या डोळ्यांसमोर मुलाचा अंत; रमानगरातील हृदयद्रावक घटनेने कामठी हादरली

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर रेल्वे फाटकाजवळील एका घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले आणि समोरचे दृश्य पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. घरात ४८ वर्षीय सुरेश गोविंदा बावणे यांचा चार दिवसांपासून कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पडून होता, तर त्यांच्याच वृद्ध आई लक्ष्मीबाई गोविंदा बावणे (वय ७०) बेशुद्ध अवस्थेत त्याच घरात पडून होत्या. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण रमानगर परिसर शोकमग्न झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश बावणे यांना दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे कौटुंबिक वाद वाढल्याने पत्नी व मुलांनी पंधरा दिवसांपूर्वी घर सोडले होते. त्यानंतर घरात फक्त सुरेश आणि त्यांची वृद्ध, अंथरुणाला खिळलेली आई राहत होती.

सुरेश यांचा मृत्यू झाल्यानंतर हालचाल करण्यास असमर्थ असलेल्या आईसमोरच मुलाचा मृतदेह दिवसेंदिवस कुजत राहिला. धक्का, असहाय्यता आणि एकटेपणामुळे त्या बेशुद्ध पडल्या. मदतीसाठी हाक मारण्याचीही त्यांच्यात ताकद नव्हती. त्यामुळे चार दिवस ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही.

घरातून असह्य दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता हा अंगावर शहारे आणणारा प्रकार उघडकीस आला. माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला, तर लक्ष्मीबाई बावणे यांना उपचारासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुरेश बावणे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येणार आहे. मात्र, एका वृद्ध आईला स्वतःच्या मुलाचा मृतदेह चार दिवस डोळ्यांसमोर पाहत असहाय अवस्थेत पडून राहावे लागणे, ही घटना प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी ठरली आहे. रमानगरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, वृद्धांच्या आधारव्यवस्थेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Popular Articles