spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

टेरेसवरील ‘एसी प्लांट रूम’च्या गैरवापरास आळा घालण्यासाठी ७ सर्वेक्षण पथके गठीत

– १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश

नागपूर :- नागपूर महानगरपालिका हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर रहिवास, वाणिज्य (व्यावसायिक) आणि औद्योगिक स्वरूपाची बांधकामे सुरू आहेत. मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदींनुसार सर्व प्रकारच्या वापरांना नियमांनुसार बांधकाम परवानगी निर्गमित केली जाते. मात्र, अनेक विकासक आणि अर्जदारांनी मंजुरी मिळवताना टेरेस मजल्यावर ‘एसी प्लांट रूम’ दाखवून नकाशे मंजूर करून घेतले असले, तरी प्रत्यक्षात मात्र मंजूर नकाशाच्या विसंगत या जागेचा वापर केला जात असल्याचे गंभीर प्रकार मनपाच्या निदर्शनास आले आहेत.

यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.३) बैठक पार पडली. याप्रसंगी नगर रचना विभागाचे सहायक संचालक ऋतुराज जाधव यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मंजूर नकाशाच्या विसंगत सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, या अनधिकृत वापरावर कडक कारवाई करण्यासाठीचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले.

या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने ७ विशेष सर्वेक्षण पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके शहरात सुरू असलेल्या अशा बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी करून, “एसी प्लांट/रूमचा वापर मंजूर बांधकाम नकाशांनुसारच होत आहे की नाही?” याची सखोल तपासणी करणार आहेत. ही सर्व पथके आगामी १५ दिवसांच्या आत आपला सविस्तर अहवाल मनपा प्रशासनाला सादर करतील असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

आयुक्त डॉ. विपीन यांनी सांगितले की, सर्वेक्षण पथकाच्या अहवालात जर बांधकामाची मंजुरी आणि प्रत्यक्ष वापर यात तफावत किंवा विसंगती आढळल्यास, अशा बांधकामांवर ‘महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६’ मधील तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला.

तपासणीसाठी येणाऱ्या मनपाच्या सर्वेक्षण पथकाला पूर्ण सहकार्य करावे आणि नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेने सर्व संबंधित विकासक, भूखंडधारक आणि बांधकाम व्यावसायिकांना केले आहे.

Popular Articles