खडकवाडी :- जगतगुरू तत्त्वदर्शी संत रामपाल महाराज यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येणाऱ्या अन्नपूर्णा मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील अहिल्यानगर मधील पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील बाळू बर्डे यांच्या गरजू कुटुंबाला आधुनिक आरसीसी घर, एक महिन्याचे रेशन, मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय मदत तसेच आवश्यक घरगुती उपयोगाच्या वस्तूंचे निःशुल्क वितरण करण्यात आले.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सुरक्षित निवासस्थान नसल्याची माहिती संत रामपाल महाराज यांच्यापर्यंत पोहोचताच सतलोक आश्रम ढवळपुरी येथील समिती व सेवादारांनी श्रमदानातून अल्पावधीत आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे आरसीसी घर उभारले. तसेच कुटुंबाला सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी आवश्यक रेशन, शैक्षणिक साहित्य आणि आरोग्यविषयक मदतही देण्यात आली. या कार्यक्रमाला अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके हे संसदीय अधिवेशनामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे प्रतिनिधी व बंधू दीपक लंके यांनी आवास वितरण कार्यक्रमास उपस्थित राहून बाळू बर्डे यांच्या कुटुंबाला नव्या घराची चावी, रेशन किट, शैक्षणिक साहित्य तसेच वैद्यकीय मदतीचे वितरण केले. यावेळी त्यांनी या सेवाकार्याचे कौतुक करत अशा मानवतावादी उपक्रमांमुळे समाजाला प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच संत रामपालजी महाराज यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी अन्नपूर्णा मोहिमेचे मुक्तकंठाने कौतुक करत, जात, धर्म किंवा पंथाचा कोणताही भेदभाव न करता गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणे हीच खरी मानवसेवा असल्याची भावना व्यक्त केली. मुनींद्र धर्मार्थ ट्रस्ट यांच्या माध्यमातून देशभरात निःशुल्क घरे, रेशन, शिक्षण व वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून समाजसेवेचा अनुकरणीय आदर्श निर्माण केला जात असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.





