spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कोलाम बांधवांच्या हक्काच्या निवाऱ्यासाठी एल्गार; शासनाने तातडीने निर्णय घ्यावा

पांढरकवडा :- क्रांतिवीर शामा दादा कोलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त शामा दादा कोलाम ब्रिगेडच्या वतीने केळापूर येथे आदिम कोलाम समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य लक्षवेधी रॅली काढण्यात आली. रॅलीत शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले होते.

रॅलीचे नेतृत्व ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष इंदिरा बोंदरे यांनी केले. यावेळी त्यांनी, स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण होऊनही कोलाम समाजाला हक्काचे घर व सातबारा मिळालेला नसल्याची खंत व्यक्त करत शासनावर टीका केली. केवळ क्रांतिवीर शामा दादा कोलाम यांच्या नावाचा राजकीय वापर न करता समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी प्रशासनाला इशारा देत, कोलाम समाजाच्या घरांना मालकी हक्क देऊन सातबारा संबंधितांच्या नावावर करावा, अन्यथा अधिक तीव्र संविधानिक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

रॅलीनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात आदिम कोलाम समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थितीच्या अभ्यासासाठी स्वतंत्र ‘शामा दादा कोलाम अभ्यास आयोग’ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. तसेच कोलाम समाजाच्या ताब्यातील घरांचे मालकी हक्क देणे, महसूल व वनजमिनींचे सातबारे व पट्टे संबंधितांच्या नावावर करणे, जात वैधता प्रमाणपत्रासाठी असलेल्या जाचक अटी रद्द करून प्रक्रिया सुलभ करणे आणि यापूर्वीच्या आंदोलनादरम्यान सुविधा उपलब्ध न करून देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली.

रॅलीदरम्यान ‘बिगर सातबारा शेतकरी संघटने’चे प्रमुख भाई जगदीशकुमार इंगळे, ज्येष्ठ नेते उरकुडा गेडाम, बबनराव कोडापे, मारोती मानकर, आकाश अत्राम, पुरुषोत्तम कोडापे, दिलीप मडावी, सौ. लीला मडावी यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोलाम समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

Popular Articles