spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पाचगाव पोलिसांची धडक कारवाई; अवैध मोहफूल गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त, २ गुन्हे दाखल, ₹१.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त 

कुही :- नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील पाचगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा चांपा पारधी बेडा येथे सुरू असलेल्या अवैध मोहफूल गावठी हातभट्टीवर पाचगाव पोलिसांनी धडक कारवाई करत संपूर्ण दारूभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत दोन महिला आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मौजा चांपा पारधी बेडा येथे उघड्या जागेत मोहफूल सडवा वापरून अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली.

या माहितीची खातरजमा करून पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगाव पोलिसांनी तातडीने छापा टाकला. कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळी सुरू असलेली हातभट्टी उद्ध्वस्त केली. यावेळी १,९०० लिटर मोहफूल सडवा, २४० लिटर गावठी दारू, रिंगण भट्टीत उकळलेले २०० लिटर मोहफूल रसायनयुक्त सडवा, प्लास्टिक व लोखंडी ड्रम, जळाऊ लाकूड, पाईप तसेच दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण ₹१,४३,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशवंत साहित्याचा घटनास्थळीच पंचनामा करून नाश करण्यात आला. या प्रकरणी दोन महिला आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास पाचगाव पोलीस करीत आहेत. नागपूर ग्रामीण पोलिसांकडून अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात सातत्याने कारवाई सुरू असून, अशा बेकायदेशीर व्यवसायावर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Popular Articles