spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने कापसी (बु.) ग्रामपंचायतीचे सचिव श्याम उंचेकर यांचा गौरव

कामठी :- कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कापसी (बु.) ग्रामपंचायतीचे सचिव श्याम एकनाथ उंचेकर यांची सन २०२४–२५ या वर्षासाठी राज्य शासनाच्या ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार’ साठी निवड झाली आहे. त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्याची दखल घेत ग्रामविकास विभागाने हा मानाचा पुरस्कार जाहीर केला असून, यशवंत राज अभियान सोहळ्यात मंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सन्मान दरवर्षी करण्यात येतो. पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांना ग्रामविकास व पंचायत राज मंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान केले जाते. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधून प्रत्येकी एका अधिकाऱ्याची निवड करण्यात आली असून, नागपूर जिल्ह्यातून श्याम उंचेकर यांनी हा बहुमान मिळविला आहे.

कापसी (बु.) ग्रामपंचायतीत विकासकामे, प्रभावी प्रशासन, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे उंचेकर यांनी ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यांच्या निवडीबद्दल ग्रामपंचायतीच्या सरपंच तुळसा डोंडे, उपसरपंच कैलास मेंटलगडे, सदस्य बंडू डोंडे, विठोबा तुमडाम, अमोल गजभिये, शीला ठाकरे, रूपाली वाघुळकर, मोनिका मेश्राम, सुशीला ठाकरे, प्रतिभा गजभिये, तसेच माजी सरपंच श्यामराव आडोळे आणि सामाजिक कार्यकर्ते पक्षभान ढोक यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Popular Articles