spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी; तिचे बळकटीकरण हीच आमची प्राथमिकता – आ. सुधीर मुनगंटीवार

– राजमाता जिजाऊंच्या नावाच्या ५ नव्या बसेसचे आ.मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी, महिला व कामगारांच्या सेवेसाठी एसटी अधिक सक्षम करण्याचा निर्धार

– बल्लारपूर बसस्थानक सुसज्ज, मूल येथे १० एकरांत नवीन डेपो; चालकांची कमतरता दूर करण्यासाठी परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची आ.मुनगंटीवार यांची ग्वाही

बल्लारपूर :- एसटी ही सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाची सेवा असून, विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांच्या प्रवासाला अधिक सुरक्षित व सक्षम करण्यासाठी एसटीचे बळकटीकरण आवश्यक आहे. “एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी; तिचे बळकटीकरण हीच आमची प्राथमिकता,” असे प्रतिपादन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या पाच नव्या बसेसचे लोकार्पण आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते बल्लारपूर येथे फीत कापून करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा,विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे, सहाय्यक विभागीय नियंत्रक छगन दिवसे, शहराध्यक्ष रणंजय सिंग, काशी सिंग, लखनसिंग चंदेल,रेणूकाताई दूधे, सारिका कणकम, देवा वाडकर आदिंची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, जिल्ह्यातील जनता आणि प्रवाशांच्या सेवेसाठी एखादी गोष्ट परिपूर्ण होत असेल, तेव्हा मला मनापासून आनंद होतो. एसटी ही केवळ वाहतुकीची सेवा नसून अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विद्यार्थी परीक्षेला जाण्यासाठी बसचा वापर करतो, शेतकरी आणि शेतमजूर बाजारपेठेत जाण्यासाठी बसवर अवलंबून असतात, तर महिलांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी एसटी अत्यंत महत्त्वाची आहे,असे त्यांनी सांगितले.

राज्याचे अर्थमंत्री असताना मोठ्या विमानतळांच्या उभारणीवर चर्चा सुरू असताना तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत बैठक घेऊन महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेसाठी बससेवा हीच सर्वात महत्त्वाची वाहतूक व्यवस्था असल्याचे निदर्शनास आणून दिले होते, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. परिवहन विभागाने ५०० नव्या बसेसची मागणी केली होती. मात्र, आपण अतिरिक्त २०० बसेसची भर घालून एकूण ७०० नव्या बसेसच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

एसटीच्या प्रवाशांची संख्या कमी होत असून त्यामागे बसेसची दुरावस्था आणि बसस्थानकांवरील अपुऱ्या सुविधाही कारणीभूत आहेत. त्यामुळे केवळ नवीन बसेस उपलब्ध करून देणे नव्हे, तर बसस्थानके आणि संपूर्ण वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे आवश्यक आहे, असे आ.सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

बल्लारपूर विभागात वाहनांसोबतच चालकांची कमतरता असल्याचे विभागीय नियंत्रकांनी निदर्शनास आणून दिल्याचा उल्लेख करत आ. मुनगंटीवार म्हणाले, “जेवढ्या बसेस उपलब्ध आहेत, तेवढ्या बसेसवर चालक उपलब्ध असणे आवश्यक आहे. हा प्रश्न मी परिवहन मंत्र्यांकडे आग्रहीपणे मांडणार असून, चालकांची कमतरता दूर करण्यासाठी निश्चितपणे पाठपुरावा करेन,” असे आश्वासन त्यांनी दिले.बल्लारपूर आणि चंद्रपूर येथील बसस्थानके सुसज्ज करण्यात आली असून, पोंभुर्णा बसस्थानकाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. तसेच मूल येथे सुमारे १० एकर परिसरात नवीन डेपो उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बल्लारपूरच्या विकासाला नवी दिशा

बल्लारपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने आग्रही राहिलो असल्याचे सांगत आ. मुनगंटीवार यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली. सुमारे ५० एकर परिसरात उभारण्यात आलेले बॉटनिकल गार्डन आता नागरिकांच्या सेवेत आहे. यासोबतच एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र, तालुका क्रीडा संकुल यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून बल्लारपूरच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.बल्लारपूरचे ग्रामीण रुग्णालय अधिक सक्षम करण्याबरोबरच सुमारे २०० कोटी रुपये खर्चून ईएसआयसीचे १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारले जात आहे. याचा लाभ बल्लारपूर आणि आसपासच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणावर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बल्लारपूरला आयुषचे अत्याधुनिक रुग्णालयासाठी प्रयत्न

आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी चर्चा करून बल्लारपूरला आयुष मंत्रालयाचे रुग्णालय देण्याची विनंती केली असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. यासाठी ३० एकर जागा उपलब्ध करून दिल्यास निसर्गोपचारापासून आयुर्वेदापर्यंतच्या उपचारांची सुविधा असलेले अत्याधुनिक रुग्णालय बल्लारपूरला देण्याची तयारी मंत्री महोदयांनी दर्शविल्याचे आ.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

पेपर मिलनंतर नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर

बल्लारपूरची अर्थव्यवस्था १९५३ पासून पेपर मिलशी जोडलेली आहे. मात्र, नव्या पिढीला विविध क्षेत्रांत रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य राखील पोलीस दलाचा प्रकल्प बल्लारपूरच्या परिसरात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे भविष्यात या परिसरात विविध व्यवसायांना मोठी चालना मिळेल, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.शिक्षण आणि आरोग्य हे बल्लारपूरच्या विकासाचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ असून एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र आणि ईएसआयसी रुग्णालयाच्या माध्यमातून या दोन्ही क्षेत्रांना मोठी ताकद मिळणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कल्याण मंडपमसाठी प्रयत्न सुरू

सुमारे १० एकर जागेत महिलांसाठी औद्योगिक वसाहत तसेच विवाह व सामाजिक कार्यक्रमांसाठी कल्याण मंडप उभारण्याचा प्रस्ताव असून, हे दोन्ही प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येत असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.