– वनविभागाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
कन्हान :- पेंच पाटबंधारे विभाग हे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या अखत्यारित पेंच पाटबंधारे उपविभाग, टेकाडी कार्यालयाच्या परिसरात बिबट्या सदृश्य हिंस्र प्राण्याचा वावर आढळुन आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सोमवार (दि.१०) ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी कार्यालय उघडताना आवारात बिबट्या सदृश्य हिंस्र प्राण्याच्या पायाचे ठसे आढळुन आले. कार्यालयाच्या आवारातील रेतीच्या ढिगाऱ्यावर खुणा व ठसे स्पष्टपणे दिसुन आले असुन त्याच ठिकाणी झोपणारा कुत्रा गायब असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पेंच पाटबंधारे विभागाचे टेकाडी येथील कार्यालय परिसराला लागुन पश्चिमेस साईबाबा आदिवासी निवासी आश्रमशाळा, दक्षिणेस नागरिकांची घरे, उत्तरेस नागरिकांची वस्ती तसेच पूर्वेस कन्हान-मनसर रोड व वृंदावन सभागृह आहे. कार्यालयाच्या आवारात साई मंदिर असल्याने येथे नागरिकांची नेहमी ये-जा सुरू असते.

बिबट्याच्या संभाव्य वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने वन विभागाने तातडीने परिसराची पाहणी करून बिबट्याला पकडुन सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी मागणी गो. बा. चिंतनवार पेंच पाटबंधारे उपविभागीय अधिकारी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेक यांना कळविल्याने सायं काळी ५ वाजता एन. बी. चव्हाण राऊंड ऑफिसर पटगोवारी, वनपरिक्षेत्र रामटेक यांनी आपल्या चंमु सह घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता बिबट चे पद चिन्ह असल्याचे निर्दशनात आल्याने आजुबाजुच्या परिसरात पेंच पटबंधारे विभागाच्या वसाहती मध्ये रिकामे घरे व झाडीझुडपी असल्याने वनविभागाचे चंमु आणि पेंच पटबंधारे उपविभाग टेकाडी चे गणेश फाले, अनिकेत मानकर, दिलीप देमदे, नथु भोंदे आदींनी वसाहती मध्ये फिरून रिकाम्या घरांचे उघडे दरवाजे बंद केले. परिसरातील आश्रमशाळेतील शिक्षक, कर्म चा-यांना व नागरिकांना रात्रीच्या वेळेस या परिसरात फिरू नये आणि सतर्कतेने राहावे व कसलिही बिबट ची हालचाल आढळल्यास त्वरित वन विभागास कळ वुन सहकार्य करण्याचे आवाहन केले. उद्या ला वन विभागा व्दारे या बिबट ला शोधण्याची कारवाई करण्यात येईल असे संबोधित केले.





