– समता सैनिक दलाच्या वतीने तक्रार; सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्याचा दावा
नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी संबंधित वस्ती, आंबेडकरी समाज आणि आरक्षणाच्या विषयावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय व अवमानकारक वक्तव्ये केल्याचा आरोप करीत इंद्रजीत सिंग नामक व्यक्तीविरुद्ध बर्डी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई समता सैनिक दला च्यावतीने करण्यात आलेल्या तक्रारीनंतर झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तक्रारदार क्षितीज दिलीप रामटेके यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रजीत सिंग नावाची व्यक्ती नागपूर शहरातील संविधान चौक परिसरात तसेच सी.जे.पी.च्या आंदोलनादरम्यान दिसून येत होती. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरी समाज तसेच आरक्षणा संदर्भात आक्षेपार्ह व जातीय स्वरूपाची वक्तव्ये करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत नमुद आहे.
तक्रारीनुसार, २३ जुलै २०२६ रोजी, संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नागपूर येथे काँग्रेस जनता पार्टीच्या वतीने आंदोलन सुरू असताना एक व्यक्ती व्हीलचेअर वर बसून काहीतरी बोलतांना दिसली. त्यानंतर तक्रारदाराच्या मित्राने संबंधित व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावरून त्याचा सोशल मीडिया अकाउंट शोधून काढला. त्यावर आंबेडकर व आरक्षणा संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्यांचे व्हिडिओ आढळल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणी समता सैनिक दला तर्फे निलेश बागळे, ॲड. तुफान कांबळे, क्षितीज रामटेके, धम्मरक्षित वागदे, रमेश नागदवणे, सौरभ मेश्राम, सिद्धार्थ नंदेश्वर, प्रदीप गणवीर, यशार्थ खोब्रागडे व निखील कांबळे यांनी पाठपुरावा केल्याचे निवेदनात नमूद आहे. तक्रारीनंतर बर्डी पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील कलम 3 (1) (r), 3 (1) (s), 3 (1) (v) तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला असल्याचे कागदपत्रात नमूद आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.





