spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मावळ तालुक्यातील दरडग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने गतीने कार्यवाही करावी –  मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

मुंबई :- पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण परिसरात अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर दरडग्रस्त तसेच दरडप्रवण गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पुनर्वसनाची कार्यवाही गतीने पूर्ण करावी, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात मावळ तालुक्यातील दरडग्रस्त व दरडप्रवण गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके,उपसचिव संजय इंगळे, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जीएसआयच्या पुणे विभागाचे मेगाचेझ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील म्हणाले, “दरडप्रवण भागातील नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच कायमस्वरूपी पुनर्वसनाची कार्यवाही प्राधान्याने करावी. धोकादायक ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.”

मावळ तालुक्यातील दरडप्रवण क्षेत्रात येणाऱ्या गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. संबंधित गावांची जीएसआयच्या वर्गवारीनुसार पाहणी करण्यात आली असून, काही गावांमध्ये पुनर्वसनासाठी आवश्यक जमीन व इतर बाबींची कार्यवाही पूर्ण झाली आहे. काही गावांचे पुनर्वसन प्रस्ताव मात्र अद्याप प्राप्त झालेले नसल्याचे बैठकीत निदर्शनास आले.

दरडग्रस्त व दरडप्रवण गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. पुनर्वसनासाठी आवश्यक जमीन, तांत्रिक अहवाल, सर्वेक्षण, प्रशासकीय मान्यता आणि निधीशी संबंधित प्रस्तावांची कार्यवाही कोणत्याही विलंबाविना पूर्ण करावी, असे निर्देश मंत्री जाधव पाटील यांनी दिले.

अतिवृष्टीच्या काळात दरडींचा संभाव्य धोका असलेल्या भागांवर प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवावे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवून सुरक्षित, कायमस्वरूपी आणि नियोजनबद्ध पुनर्वसनाला प्राधान्य द्यावे, असेही मंत्री जाधव पाटील यांनी स्पष्ट केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.