खापा, वार्ताहर :- हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत ३०० कोटी वृक्षलागवड कार्यक्रम तसेच व्ही.बी.-जी.-आर.ए.एम.-जी. योजनेंतर्गत सावनेर तालुक्यातील वेलतूर, गोसेवाडी, इसापूर व वाकी ग्रामपंचायतींच्या परिसरात मंगळवारी (११ ऑगस्ट) वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
जिल्हा परिषद नागपूरचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाक) डॉ. कैलास घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. वेलतूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर भोयर, ग्रामपंचायत अधिकारी गायकवाड व ग्राम रोजगार सेवक नंदू मोंढे यांनी डॉ. घोडके यांचे स्वागत करून आभार मानले.

यावेळी वेलतूर येथे लाभार्थ्यांच्या शेतात गुलाब लागवडीची पाहणी करण्यात आली. गोसेवाडी व इसापूर येथे सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शाळा व अंगणवाडीला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. अंगणवाडीतील बालकांना ग्रामपंचायतीच्या वतीने गणवेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास सावनेरचे गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उमाठे उपस्थित होते. व्ही.बी.-जी.-आर.ए.एम.-जी. सावनेरचे विभाग प्रमुख तथा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिनेश सोमकुवर, शुभांगी नागदवणे, तांत्रिक सहायक (कृषी) सूरज शेंडे व अजय चाफेकर यांनी वृक्षलागवड व संगोपनाच्या कामाची जबाबदारी सांभाळली.
दरम्यान, पंचायत समिती कामठी अंतर्गत ७६ ग्रामपंचायतींमध्येही वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामीण भागात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी या अभियानातून महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.





