spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सावनेरच्या हेमांडपंथी शिव मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

सावनेर :- सावनेर शहरातील पहलेपार येथील ऐतिहासिक हेमांडपंथी पुरातन शिव मंदिर देवस्थानाला नागरी क्षेत्रातील ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मान्यता मिळाली आहे. २० जुलै २०२६ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

या मान्यतेचे प्रमाणपत्र जिल्हा नियोजन अधिकारी संजय कडू यांच्या हस्ते सावनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा संजना मंदार मंगळे, हेमांडपंथी पुरातन शिव मंदिर देवस्थानचे अध्यक्ष लवकेश सेवके, कोषाध्यक्ष किशोर गुऱ्हारीकर, उपाध्यक्ष राजू घुगल, गटनेते रविंद्र ठाकूर आणि नगरसेविका मनीषा खंगारे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी मंदार मंगळे, सोमचंद सेवके, सदानंद मोवाडे, विनोद बागडे, मनीष खंगारे, पिंटू सातपुते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या सावनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान नगराध्यक्षा संजना मंदार मंगळे तसेच प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक उमेदवारांनी हेमांडपंथी पुरातन शिव मंदिराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिष देशमुख आणि विधान परिषद आमदार डॉ. राजीव पोतदार यांच्या पुढाकाराने, भाजप नेते रामराव मोवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्षा संजना मंदार मंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रस्ताव मार्गी लागल्याचे सांगण्यात आले.

‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे मंदिराच्या धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाला अधिकृत मान्यता मिळण्यासोबतच मंदिर परिसराच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. भाविकांसाठी आवश्यक सुविधा, पायाभूत विकास आणि धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.

सावनेरच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवात भर घालणाऱ्या या निर्णयाचे शहरवासीय तसेच भाविकांनी स्वागत केले असून, मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

Popular Articles