spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वीज दुरुस्ती करताना मजहर अलींचा मृत्यू; संसाराचा आधार हरपला, आता ८ लाखांची मदत अन् मुलाला नोकरीचे आश्वासन

कामठी :- कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी रोज जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मजहर अली यांच्या आयुष्याची विद्युत खांबावरच अखेर झाली. ३ ऑगस्ट रोजी कमसरी बाजार परिसरात स्ट्रीट लाईट दुरुस्तीचे काम करताना विजेच्या धक्क्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने पत्नी आणि दोन मुलांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला. घरातील एकमेव कमावता आधार हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

मजहर अली हे दैनंदिन वेतनावर काम करणारे कर्मचारी होते. कुटुंबाच्या दोन वेळच्या उदरनिर्वाहासाठी ते मेहनत करीत होते. मात्र, काम करताना झालेल्या या दुर्दैवी दुर्घटनेने त्यांच्या कुटुंबाचे आयुष्यच बदलून गेले. वडिलांचे छत्र हरपलेल्या दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता.

या दुःखद प्रसंगाची गांभीर्याने दखल घेत माजी जिल्हा परिषद सभापती प्रा. अवंतीका ताई लेकुरवाळे व माजी नगराध्यक्ष शकूर नागानी यांनी पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत छावणी परिषद प्रशासनाकडे मदतीसाठी पाठपुरावा केला. प्रशासनासोबत तब्बल तीन तास चर्चा करून कुटुंबाला न्याय आणि आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी मागणी लावून धरली.

या प्रयत्नांना अखेर यश आले. प्रशासनाने मजहर अली यांच्या कुटुंबाला ८ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे तसेच त्यांच्या एका मुलाला छावणी परिषदेत नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिले.

आधार हरवलेल्या कुटुंबाला आशेचा किरण

पित्याच्या निधनाने पोरक्या झालेल्या मुलांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम या निर्णयामुळे काही अंशी होणार आहे. पैशांची मदत ही गेलेला जीव परत आणू शकत नाही; मात्र उद्याचा संसार कसा चालवायचा, मुलांचे शिक्षण आणि भविष्य कसे घडवायचे, या चिंतेत असलेल्या कुटुंबाला या मदतीमुळे मोठा आधार मिळणार आहे.

मजहर अली आज आपल्यात नाहीत; मात्र त्यांच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी मिळालेला हा आधार त्यांच्या संघर्षाची आणि त्यागाची जाणीव समाजासमोर कायम ठेवणारा ठरणार आहे. पीडित कुटुंबाच्या हक्कांसाठी केलेल्या या प्रयत्नांमुळे एका असहाय कुटुंबाला पुन्हा उभे राहण्याची आशा मिळाली आहे.

Popular Articles