spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हद्दपार आरोपीचा कामठीत बेकायदा प्रवेश; आरोपीच्या कमरेतून धारदार चाकू जप्त

– जुनी कामठी पोलिसांची कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान धडाकेबाज कारवाई; सराईत आरोपीवर तब्बल ७० गुन्हे

कामठी :- हद्दपार आदेशाची पायमल्ली करून कामठी शहरात बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत आरोपीला जुनी कामठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान गतरात्री ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्या कमरेतून धारदार लोखंडी चाकू आढळून आल्याने पोलिसांनी तो जप्त केला. विशेष म्हणजे, नमूद आरोपीविरुद्ध नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल ७० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

१२ ऑगस्ट रोजी रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासह अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत होते. यावेळी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोहम्मद शाहीद वल्द एजाज असांरी (वय ४२, रा. दरोगा मस्जिदजवळ, वारीसपुरा, कामठी) हा हद्दपार इसम दरोगा मस्जिद परिसरात आढळून आला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेतून अंदाजे १०० रुपये किमतीचा धारदार लोखंडी चाकू मिळून आला. पोलिसांनी सदर चाकू जप्त केला.

पोलिस उपायुक्त, परिमंडळ क्रमांक ६, नागपूर शहर यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या हद्दपार आदेशानुसार आरोपीला नागपूर शहरातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, कोणतीही परवानगी न घेता त्याने कामठी शहरात प्रवेश केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

नमूद आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ७० गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे हद्दपार आरोपीचा बेकायदा प्रवेश आणि त्याच्याकडून धारदार शस्त्राची जप्ती ही कारवाई कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध कलम १४२, १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जुनी कामठी पोलीस करीत आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त संदीप पखाले व एसीपी अंकुश खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेश्राम, पोलीस हवालदार श्रीकांत भीषनुरकर, पोलीस शिपाई शाहरुख खान आणि पोलीस शिपाई अमित ताजणे यांच्या पथकाने केली.

Popular Articles