– राष्ट्राभिमानाने भारावले कामठी शहर
कामठी :- भारताची आन, बान आणि शान असलेल्या तिरंग्याच्या साक्षीने कामठी शहर आज देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेले. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण, राष्ट्राभिमानाची भावना आणि नव्या पिढीत देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्याचा संदेश देत आमदार राजीव पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली कामठीत भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले.
“तिरंगा हा केवळ ध्वज नाही, तर देशाच्या स्वाभिमानाचे आणि बलिदानाच्या इतिहासाचे प्रतीक आहे,” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिरंग्यांनी सजलेले रस्ते, देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमलेले वातावरण आणि हातात अभिमानाने फडकणारे राष्ट्रध्वज यामुळे कामठीत सर्वत्र राष्ट्रभक्तीचा जोश पाहायला मिळाला.
गुरुवारी १३ ऑगस्ट ला सकाळी 9.30 वाजता कामठी नगर परिषद कार्यालयातून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. ही तिरंगा यात्रा मोटर स्टँड चौक, जयस्तंभ चौक, हुतात्मा स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हैदरी चौक, नेताजी चौक आदी प्रमुख मार्गांवरून यात्रा मार्गक्रमण करीत पुन्हा नगर परिषद कार्यालयात पोहोचुन यात्रेचा समारोप करण्यात आला.
आमदार राजीव पोद्दार यांच्या मार्गदर्शनामुळे या उपक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून, प्रशासन, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि नागरिकांना एका राष्ट्रभावनेच्या धाग्यात जोडण्याचे काम या तिरंगा यात्रेने केले
या तिरंगा यात्रेत माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान, कामठी नगर परिषदेचे नगराध्यक्ष अजय अग्रवाल, उपाध्यक्ष सबा परवीन तौसिफ खान, येरखेडा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष राजकीरण बर्वे, बिडगाव नगर पंचायतीचे अध्यक्ष विरू जामगडे, तहसीलदार गणेश जगदाडे, नायब तहसीलदार मयूर चौधरी, नायब तहसीलदार अमर हांडा, मुख्याधिकारी विनोद जाधव, गटविकास अधिकारी पियुष डोंगरे, सहाय्यक गटविकास अधिकारी पंकज लोखंडे, विस्तार अधिकारी प्रवीण गावंडे, तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शबनम खानुनी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे,कामठी नगर परिषद चे प्रशासन अधिकारी महेश चोबे, सुशांत जगताप यांच्यासह तालुका प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, नागरिक तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाचे संचालन मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी केले, तर तहसीलदार गणेश जगदाडे यांनी आभार मानले. नगर परिषद प्रांगणात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.





