spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूरकरांची मोठी झेप; 75 टक्क्यांहून अधिक ग्राहकांकडून ऑनलाईन वीजबिल भरण्याला पसंती

नागपूर :- डिजिटल युगाच्या वेगाशी कदम ताल करत नागपूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी एक नवा आणि गौरवास्पद विक्रम प्रस्थापित केला आहे. जुलै 2026 मध्ये ग्राहकांनी केलेल्या वीज बिल भरण्याच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील तब्बल 75.50 टक्के ग्राहकांनी आपले वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईन आणि डिजिटल पर्यायांना पसंती दिली आहे. एकेकाळी वीज बिल भरण्यासाठी वीज कार्यालयांच्या किंवा संकलन केंद्रांच्या केंद्रांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि तासन्तास प्रतीक्षा करण्याची वेळ आता इतिहासजमा होत असून, नागपूरकर खऱ्या अर्थाने डिजिटल होत असल्याचे हे स्पष्ट चित्र आहे.

महावितरणने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेले अत्यंत सुटसुटीत, वेगवान आणि सुरक्षित डिजिटल प्लॅटफॉर्म्स अत्यंत वरदान ठरले आहेत. नागपूर जिल्ह्यात जुलै 2026 मध्ये एकूण 12 लाख 75 हजार 825 ग्राहकांनी वीजबिलांचा भरणा केला, ज्यातून 478 कोटी 97 लाख रुपयांचा महसूल गोळा झाला. विशेष म्हणजे, यातील 9 लाख 72 हजार 9 ग्राहकांनी केवळ ऑनलाईन माध्यमातून 394 कोटी 43 लाख रुपयांचा भरणा महावितरणच्या तिजोरीत केला आहे. मार्च 2026 च्या तुलनेत ऑनलाईन बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत तब्बल 4.47 टक्क्यांची, तर एकूण जमा होणाऱ्या डिजिटल महसुलात 5.17 टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली आहे, जी अत्यंत सकारात्मक बाब आहे.

शहर असो वा ग्रामीण, सर्वत्र डिजिटलचा बोलबाला: या डिजिटल प्रवाहात केवळ शहरेच नव्हे, तर ग्रामीण भागही मागे नाही. नागपूर शहर मंडळात सर्वाधिक 77.24 टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी डिजिटल पेमेंटचा वापर करत 314 कोटी 35 लाख रुपये (82.32 टक्के महसूल) ऑनलाईन जमा केले आहेत. दुसरीकडे, ग्रामीण मंडळातील तब्बल 73.77 टक्के ग्राहकांनी 80 कोटी रुपयांचा (82.48 टक्के महसूल) भरणा ऑनलाईन करून ग्रामीण भागातील वाढत्या तांत्रिक साक्षरतेचे आणि प्रगतीशील विचारांचे उत्तम दर्शन घडवले आहे. नागपूर जिल्ह्यातील हा वाढता आकडा राज्यासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

ऑनलाईन बिल भरण्याचे अनेकविध फायदे आणि सवलतींचा वर्षाव: महावितरणने डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी फायद्यांच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. www.mahadiscom.in ही अधिकृत वेबसाइट, ‘महावितरण’ मोबाइल ॲप, महापॉवर पे आणि इतर पेमेंट गेटवेच्या माध्यमातून बिल भरल्यास ग्राहकांना दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सवलत मिळते. तसेच, विहित मुदतीपूर्वी बिल भरणाऱ्यांना ‘तत्पर देयक सवलत’ आणि कागदी बिलांऐवजी ‘गो-ग्रीन’चा पर्यावरणपूरक पर्याय निवडल्यास वार्षिक तब्बल वार्षिक 120 रुपयांची अतिरिक्त बचत करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व माध्यमांतून बिल भरण्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. वेळेची बचत, चोवीस तास (24×7) उपलब्ध असलेली सुविधा, आणि संपूर्ण पारदर्शकता ही या प्रणालीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

सुरक्षितता आणि तात्काळ पोच पावती: ऑनलाईन वीजबिल भरताच ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच पावती मिळते, तसेच मागील संपूर्ण पेमेंट हिस्ट्री वेबसाईटवर सहज उपलब्ध असते. ही संपूर्ण पेमेंट प्रक्रिया अत्यंत सुरक्षित असून तिला रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पेमेंट व सेटलमेंट कायदा-2007 च्या कठोर तरतुदी लागू आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांची पूर्ण सुरक्षितता सुनिश्चित केली जाते.

“डिजिटल पेमेंटमुळे ग्राहकांचा मौल्यवान वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असून ही संपूर्ण प्रक्रिया पर्यावरणपूरक आहे. वीजबिल भरण्यासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे ज्या ग्राहकांनी अद्याप डिजिटल पर्यायांचा वापर सुरू केलेला नाही, त्यांनी कुठलाही विलंब न करता या अत्यंत सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर अशा डिजिटल पर्यायांचा तातडीने अवलंब करावा आणि आपल्या वेळेची व पैशांची बचत करावी.”, असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.