spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

टीबी’मुक्त महाराष्ट्रासाठी उद्योगांनी ‘सीएसआर’च्या माध्यमातून पुढाकार घ्यावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

· टीबीमुक्त भारत-कॉर्पोरेट सहभाग शिखर परिषद

मुंबई :- टीबीमुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी शासन आणि उद्योगांनी हातात हात घालून मिशन मोडवर काम करणे आवश्यक आहे. उद्योगांनी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

ताज प्रेसिडेंट येथे आयोजित टीबीमुक्त भारत-कॉर्पोरेट सहभाग शिखर परिषद २०२६ अंतर्गत धोरणात्मक कॉर्पोरेट भागीदारीद्वारे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात मंत्री आबिटकर बोलत होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभियान राबवत आहेत. या अभियानात समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र आल्यास राज्यातील सार्वजनिक आरोग्याचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करता येईल. त्यासाठी सीएसआर हा महत्वाचा पर्याय ठरू शकतो. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सातत्याने विविध आरोग्य अभियान राबविण्यात येत आहेत. मात्र, काही नागरिक आजाराच्या तपासणीसाठी पुढे येत नाहीत. तपासणी आणि उपचारांविषयीची भीती, आजारामुळे स्वतःला आणि कुटुंबाला होणाऱ्या त्रासाची चिंता यामुळे ते तपासणी टाळतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून काम करणे गरजेचे आहे.

विशेषतः शहरांमध्येही टीबीबाबत जनजागृतीवर अधिक भर द्यावा. आजाराचे निदान उशिरा होण्यापेक्षा नागरिकांना वेळेत तपासणीसाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योगांचे सहकार्य आणि योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी केवळ शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले; या कामाला अपेक्षित गती देण्यासाठी सर्व संबंधित कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिओ, कोरोना आणि एड्सविरोधातील मोहिमांचा अनुभव पाहता मिशन मोडवर काम केल्यास आरोग्यविषयक अभियान यशस्वी होऊ शकते. त्याच धर्तीवर टीबीविरोधात लक्ष्यित तपासणी करून आवश्यक उपाययोजनांवर भर दिल्यास महाराष्ट्राच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण काम करता येईल. टीबीमुक्त महाराष्ट्रासाठी शासन आणि उद्योगांनी एकत्रितपणे पुढे जाण्याची सुरुवात या कार्यक्रमातून करावी, असे आवाहन त्यांनी केले.

अशा प्रकारचे कार्यक्रम आणि शासन- कॉर्पोरेट उद्योग संवाद सातत्याने व्हायला हवेत. अभियानाला गती देण्यासाठी सर्वांचा पुढाकार लाभल्याने मंत्री आबिटकर यांनी आभार व्यक्त केले.

लोकसहभागातून २०३० पूर्वी क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य साध्य करू – राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

क्षयरोग निर्मूलनासाठी शासनाच्या प्रयत्नांना समाजातील विविध घटकांची साथ आवश्यक आहे. सर्वांच्या सहभागातून २०३० पूर्वी क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य निश्चितपणे साध्य करता येईल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले की, केंद्र किंवा राज्य शासन एकट्याने सामाजिक बदल घडवू शकत नाही. त्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील सहकाऱ्यांचा सक्रिय सहभाग व सहकार्य आवश्यक आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्षयरोगमुक्त भारत अभियानाशी संबंधित ‘निक्षय मित्र’ उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः निक्षय मित्र झाले असून, अनेक लोकप्रतिनिधी आणि समाजातील नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला आहे. क्षयरुग्णांना औषधांसह आवश्यक प्रथिनयुक्त आहार उपलब्ध करून देण्यासाठी निक्षय मित्र योगदान देत आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रजोनिवृत्ती आणि पीसीओडीसाठी स्वतंत्र दवाखाने सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले. पीसीओडीमुळे अनेक किशोरवयीन मुलींना शारीरिक तसेच मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर संबंधित आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम महत्वाचा ठरत आहे.

राज्याने २०३० पर्यंत थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्राचे ध्येय ठेवले आहे. बालकांमधील स्थूलतेच्या समस्येवरही काम सुरू असून, त्यासाठी युनिसेफ आणि रोटरी क्लब यांसारख्या संस्था सहकार्य करीत आहेत. आरोग्यविषयक उपक्रमांसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था वेळ व निधी देऊन शासनाचे भागीदार होत आहेत. समाजातील आणखी घटकांनी पुढे येऊन या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

यावेळी आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, राज्य टीबी अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार, पाथच्या संचालक डॉ. आशा हेगडे, उपसंचालक डॉ. दीपक बालसुब्रमण्यम आणि विविध कॉर्पोरेट कंपनीच्या प्रतिनिधींनी टीबीमुक्त भारत अभियानाबाबत सादरीकरण केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.