spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तिरंग्याच्या प्रकाशात न्हाऊन निघाले नवीन कामठी पोलीस ठाणे

– स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात पोलीस ठाण्याला आकर्षक रोषणाई

संदीप कांबळे,कामठी :- स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला देशभक्तीच्या रंगांची झालर देत नवीन कामठी पोलीस ठाणे तिरंग्याच्या आकर्षक रोषणाईने उजळून निघाले आहे. रात्रीच्या अंधारात केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या प्रकाशात न्हाऊन निघालेली पोलीस ठाण्याची भव्य इमारत नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्रीय उत्सवाची जय्यत तयारी शहरात सुरू असून, विविध शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांना आकर्षक सजावटीने सजविण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या इमारतीवर तिरंग्याच्या रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी दूरवरूनही उठून दिसणारी ही रोषणाई परिसराच्या सौंदर्यात भर घालत आहे.

नवीन कामठी पोलीस ठाणे परिसरात डीसीपी, एसीपी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची कार्यालये कार्यरत असल्याने येथे नागरिकांची सातत्याने वर्दळ असते. त्यामुळे या इमारतीवरील तिरंगा रोषणाई नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. रात्रीच्या वेळी या रोषणाईचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी नागरिक काही क्षण थांबत असून, स्वातंत्र्यदिनाचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरही दिसून येत आहे.

तिरंग्याच्या रंगांनी झळाळणारी पोलीस ठाण्याची इमारत केवळ सजावटीपुरती मर्यादित न राहता राष्ट्रध्वजाप्रती आदर, स्वातंत्र्याची जाणीव आणि देशभक्तीची भावना जागविणारा संदेश देत आहे. या रोषणाईमुळे पोलीस ठाण्याचा परिसरही देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि संविधानिक मूल्यांचा जागर राखत राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन डीसीपी संदीप पखाले, एसीपी अंकुश खेडकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तिरंग्याच्या तेजस्वी प्रकाशात उजळलेले नवीन कामठी पोलीस ठाणे सध्या कामठीकरांच्या आकर्षणाचे केंद्र बनले असून, स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला या रोषणाईने आणखी झळाळी दिली आहे.

Popular Articles