spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भिक्षामुक्त समाजासाठी आस्था निवारा गृहाची जनजागृती रॅली उत्साहात

नागपूर :- भिक्षामुक्त समाजाची निर्मिती आणि नागरिकांमध्ये भिक्षावृत्तीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित आस्था निवारा गृहाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘भिक्षामुक्त नागपूर’चा संकल्प नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच गरजू व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी समाजाचा सक्रिय सहभाग मिळविणे, हा रॅलीचा प्रमुख उद्देश होता. रॅलीमध्ये नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी, गणेशपेठ व इमामवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, सह्याद्री संस्थेचे संचालक विजय क्षीरसागर, प्रकल्प संचालक देवेंद्र क्षीरसागर, व्यवस्थापक दीपक पसारकर, व्यवस्थापक नितेश नागदेवे, अधीक्षक गौतम अशोक नागरे, सामाजिक कार्यकर्ते तुषार हुकरे, समुपदेशक वैभव बागडे, शांती सदन महिला भिक्षेकरी निवारागृहाच्या वॉर्डन अनिता गंधरवार, काळजीवाहक अनंता नागोसे, कार्तिक कोडवते, प्राची व झेबा खान यांच्यासह कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅलीदरम्यान ‘भिक्षा देऊ नका, पुनर्वसनाला साथ द्या’, ‘भिक्षामुक्त नागपूर—आपली सामूहिक जबाबदारी’, ‘गरजू व्यक्तींना मदत करा, भिक्षावृत्तीला प्रोत्साहन देऊ नका’ अशा संदेशांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. सहभागी नागरिकांनी हातात जनजागृतीपर फलक व राष्ट्रध्वज घेऊन भिक्षावृत्तीमुक्त नागपूरचा संदेश दिला.

भिक्षावृत्ती ही केवळ वैयक्तिक समस्या नसून गंभीर सामाजिक प्रश्न आहे. त्यामुळे रस्त्यावर भिक्षा देण्याऐवजी भिक्षा मागणाऱ्या गरजू व्यक्तींना निवारा, समुपदेशन, आरोग्यसेवा, कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी आणि सन्मानपूर्वक पुनर्वसन मिळवून देण्यासाठी प्रशासन व सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. आस्था निवारा गृहामार्फत गरजू व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, या कार्याला लोकसहभागाची जोड मिळावी, यासाठी रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले. ‘भिक्षामुक्त नागपूर’ घडविणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक सामाजिक जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. आस्था निवारा गृहाच्या टीमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अधिकारी, कर्मचारी, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाची जोड मिळाल्याने ही जनजागृती रॅली उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात संपन्न झाली. भिक्षामुक्त समाजासाठी एक पाऊल, भिक्षेऐवजी पुनर्वसनाला हातभार आणि सन्मानाने जगण्याची नवी सुरुवात – या संकल्पनेतून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आस्था निवारा गृहाच्या वतीने करण्यात आले.

Popular Articles