– मौदा तालुक्यातील बोरी-घिवारी ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; सरपंच विशाल सेलोकर यांच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
किशोर साहू, मौदा :- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत गट ग्रामपंचायत बोरी-घिवारीच्या वतीने यंदाही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग बांधव कु. रोहित बुरुडे हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यानंतर बोरी व वाघबोडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प सरपंच विशाल सेलोकर यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक साहित्य देणे नव्हे, तर ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले.
“गावाचा विकास म्हणजे केवळ रस्ते, नाल्या आणि इमारती नव्हे,आपल्या गावातील मुलांना चांगले शिक्षण आणि त्यांच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने निर्माण करणे हाच खरा विकास आहे,” अशी भूमिका सरपंच विशाल सेलोकर यांनी यावेळी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, बोरी-घिवारी ग्रामपंचायतीत सरपंच विशाल सेलोकर यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने नवनवीन आणि समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. शिक्षण, आरोग्य, सामाजिक बांधिलकी, महिला व बालकल्याण तसेच गावाच्या मूलभूत विकासकामांना प्राधान्य देत ग्रामपंचायतीने आपल्या कामाची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे मौदा तालुक्यात नवनवीन उपक्रम राबविणारी आणि लोकाभिमुख काम करणारी ग्रामपंचायत म्हणून बोरी-घिवारीची चर्चा होत आहे.
यावेळी कार्यक्रमाला पशुवैद्यकीय अधिकारी कोदामेंढी डॉ. रिना रामटेके, वैद्यकीय अधिकारी अरोली डॉ. मानसी हरणे, ठाणेदार अरोली स्नेहल राऊत, ग्रामविकास अधिकारी वैभव बावनकर, उपसरपंच दिनेश पटले, ग्रामपंचायत सदस्यगण नंदू खंडाईत, वेंकटरमण जित्तुगा,मेघा बोंबले ,सुषमा राऊत ,स्वरस्वती पंपन्ना, संगीता गभणे,मुख्याध्यापक बोरी प्रतेके,आशा सेविका रंजना चवळे,अंगणवाडी सेविका दामिनी तिजारे ,तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा भुते ,शाळा समिती अध्यक्ष अश्विनी गोंधुळे ,मुख्याध्यापक वाघबोडी पठाले,अंगवाडी सेविका माला पटले , शिक्षकवृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अल्पावधीतच विविध लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून युवा सरपंच विशाल सेलोकर यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण केली आहे. पारंपरिक पद्धतीच्या ग्रामपंचायत कारभाराला विकासाची आणि सामाजिक उपक्रमांची जोड देत त्यांनी गावातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला आहे.
विशेषतः शिक्षण व्यवस्थेला दिलेले प्राधान्य ही त्यांच्या कार्याची ठळक बाजू मानली जात आहे. शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
“गाव बदलायचे असेल तर सुरुवात शिक्षणापासून झाली पाहिजे,” या विचारातून विद्यार्थ्यांसाठी भविष्यातही आणखी उपक्रम राबविण्याचा निर्धार सरपंच विशाल सेलोकर यांनी व्यक्त केला.
दिव्यांग बांधवांच्या हस्ते ध्वजारोहण करून समाजातील प्रत्येक घटकाला समान सन्मान देण्याचा संदेश आणि विद्यार्थ्यांच्या हातात स्कूल बॅग देऊन शिक्षणाला प्राधान्य देण्याचा संकल्प, या दोन्ही गोष्टींमुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन बोरी-घिवारी ग्रामपंचायतीसाठी विशेष ठरला.
गावाच्या विकासासोबतच सामाजिक जाणीव, शिक्षण आणि लोकसहभाग यांचा सुंदर मेळ घालत सरपंच विशाल सेलोकर यांच्या नेतृत्वाखाली बोरी-घिवारी ग्रामपंचायतीची विकासाची आणि समाजसेवेची वाटचाल सुरू आहे.








