कामठी :- पावसाळ्याच्या दिवसांत सापांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या घरांमध्ये, वस्त्यांमध्ये तसेच शेतशिवारात साप आढळण्याच्या घटना वाढत आहेत. साप दिसताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अशावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धाव घेणारे सर्पमित्र महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, या धाडसी कार्याकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याने सर्पमित्रांना विमा संरक्षणासह मानधन आणि आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी जोरदार मागणी घोरपड येथील प्रगतिशील तरुण शेतकरी मंगेश लांजेवार यांनी केली आहे.
विषारी आणि बिनविषारी साप पकडून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे जबाबदारीचे काम सर्पमित्र करतात. नागरिकांकडून मदतीचा फोन येताच स्वतःची कामे बाजूला ठेवून ते घटनास्थळी पोहोचतात. साप पकडताना जीविताचा धोका असतानाही अनेक सर्पमित्रांकडे सुरक्षेसाठी आवश्यक साधने उपलब्ध नसतात. त्यातच वाहनाचा इंधनखर्च, प्रवासाचा खर्च आणि वेळ यासाठी त्यांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो.
पकडलेल्या सापांना सुरक्षित अधिवासात सोडण्यासाठी अनेकदा दूरवर जावे लागते. त्यामुळे सर्पमित्रांना आर्थिक भार सहन करावा लागतो. नागरिकांच्या जीवाचे रक्षण आणि सापांचेही संरक्षण, अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणाऱ्या या सेवाभावी कार्यकर्त्यांना प्रशासनाने केवळ मदतीच्या आवाहनापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या सुरक्षेची आणि आर्थिक स्थैर्याची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे.
सर्पमित्रांचे कार्य हे केवळ साप पकडण्यापुरते मर्यादित नसून मानव-सर्प संघर्ष टाळण्यासोबतच वन्यजीव संवर्धनासाठीही ते महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने सर्पमित्रांची अधिकृत नोंदणी करून त्यांना अपघाती विमा संरक्षण, आवश्यक सुरक्षा साहित्य, प्रवासासाठी इंधन भत्ता तसेच योग्य मानधन देण्याची ठोस व्यवस्था करावी. सर्पमित्रांच्या जीवाला किंमत देऊन त्यांच्या सेवेला योग्य सन्मान मिळावा, अशी अपेक्षा मंगेश लांजेवार यांनी व्यक्त केली.








